Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील बारावा बलुतेदार चौगुला होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

       सुरुवातीला मानवधर्माची निर्मिती सिंधू संस्कृतीमध्ये झाली.मानवाला आवश्यक साधन संपत्तीचा विकास सिंधू संस्कृतीमध्ये झाला आहे.सिंधू संस्कृतीमध्ये कृषी क्रांती झालेली आहे.....आणि ही क्रांती स्त्रियांनी केलेली आहे....आणि या सिंधू संस्कृतीमध्ये आर्यांचे आक्रमण झाले....म्हणजेच भारतावर पहिले परदेशी आक्रमण हे आर्यांनी केलेले आहे.आर्यांनी आक्रमण करून इथे सनातन धर्म व्यवस्था निर्माण केली आहे.मातीत “बी” पेरून पहिला पुरुष शेतकरी झाला तो “बळीराजा” होय.....आणि या बळीराजाला संपविण्याचे काम आक्रमित आर्यांनी केलेले आहे.सिंधू संस्कृतीमधून निर्माण झालेल्या देशाला सनातन धर्म व्यवस्थे विरुध्द संघर्ष करून पहिला मानवधर्म देण्याचे कार्य हे गौतम बुध्दांनी केले आहे....आणि हा संपूर्ण भारत देश बौद्धमय करण्याचे कार्य सम्राट अशोक यांनी केले आहे.आर्य नंतरच्या काळात वैदिक धर्म स्थापन करून ते वैदिक धर्म पंडीत झाले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात यांना वैदिक धर्म पंडीतच म्हणायचे.परंतु यांना गावगाड्यामध्ये ग्रामदैवत आणि कुलदैवत यांचे पूजन करायचा अधिकार नव्हता.गावगाड्यातील ग्रामदैवतेचे आणि कुलदैवतेचे पूजन करण्याचा अधिकार हा अलुतेदार यांनाच होता....कारण वैदिक धर्म पंडित गावगाड्यातील लोकांना शुद्र मानीत होते...आणि शुद्राच्या घरी ते कधीही येत नव्हते....म्हणूनच छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हा स्वराज्यातील वैदिक धर्म पंडितांनी केला नाही.जेव्हा पेशवाईला सुरुवात झाली तेव्हा अष्टविनायकांची मंदिरे स्थापन झाली तेव्हा हा वैदिक धर्म पंडित ब्राह्मण झाला....आणि त्याने ब्राह्मण धर्म स्थापन केला आहे.

       छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार घेऊन स्वराज्य निर्माण केले.त्यातील बारा बलुतेदार नेमके कोण होते हे गेल्या अकरा लेखातून अकरा बलुतेदार म्हणजे १) महार २) सुतार ३) लोहार ४) चांभार ५) कुंभार ६) न्हावी ७) सोनार ८) जोत्सी ९) परिट १०) गुरव ११) कोळी समजून घेतले आहे.आता आपण या लेखात शेवटचा बलुतेदार म्हणजे बारावा बलुतेदार “चौगुला” समजून घेणार आहोत.गावगाड्यातील लोकांना एकत्रित करून त्यांना काय काम द्यायाचे हे चौगुला ठरवायचा.गावच्या कार्यक्रमात एखादा मोठा व्यक्ती गावात आला की त्याचे स्वागत करण्याचे काम चौगुला यांचेकडे असायचे.त्या कार्यक्रमाचे जेवणाची सोय करणे म्हणजे जेवणासाठी लागणारी भांडीकुंडी जमवायचे भाजीपाला जमवायचे तसेच सदरच्या कार्यक्रमाचे गावगाड्यातील लोकांना निमंत्रण देण्याची जबाबदारी ही या चौगुल्याकडे होते.हे काम चौगुल्याचे असणारे दहा कुटुंबापैकी एक दोन कुटुंब करायची...आणि इतर कुटुंबातील लोक काळीमध्ये “बी” पेरून शेती करायची.शेती करत असल्यामुळे चौगुला पुढे “कुणबी” म्हणून ओळखला जाऊ लागला.

      छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या सैन्यामध्ये हा चौगुला भरती होऊन स्वराज्याच्या लष्कराची ताकद वाढवून तो स्वराज्याचा मावळा झाला.याच स्वराज्याच्या मावळ्याला पुढे “मराठा” म्हणून संबोधले जाऊ लागले.त्यामुळे आजचा मराठा हा दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वराज्यासाठी लढणारा अलुतेदार बलुतेदार आहेत.आज या समाजाची ओळख पुसली गेली आहे.तो अस्तित्वहीन झालेला आहे.

स्वराज्यातील अकरावा बलुतेदार कोळी होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

 
 

     आज आपण गावगाड्यातील अकरावा बलुतेदार म्हणजेच कोळी समजून घेणार आहोत.गेल्या दहा लेखात आपण दहा बलुतेदार कोण आहेत....आणि त्यांचे गावगाड्यातील अस्तित्व आणि योगदान काय होते ते समजून घेतले आहे.या गावगाड्यावर सिंधू संस्कृतीचा कसा पगडा होता हे समजून घेतले आहे....आणि या सिंधू संस्कृतीवर आर्यांचे आक्रमण कसे झाले हे समजून घेतले आहे.त्याचप्रमाणे या आर्यांनी या सिंधू संस्कृतीवर ताबा मिळविण्यासाठी सनातन व्यावस्था कशी निर्माण केली हे आपण समजून घेतले आहे.या सनातन व्यवस्थे विरोधात  गौतमी पुत्र सिध्दार्थ म्हणजे गौतम बुद्धांनी सिंधू संस्कृती मधील विद्वानांचा कसा सन्मान करून मानवधर्म म्हणजेच बौध्द धम्म उभा केला हे आपण समजून घेतले आहे.याच धर्माचे संस्कार गावगाड्यावर कसे निर्माण करण्यात वारकरी पंथ याच बलुतेदार आणि अलुतेदार यांनी स्थापन करून गावगावात भगव्या निशाणाखाली समताप्रस्थापित केल्याचे समजून घेतले आहे.त्यामुळे गावागावातून आजही समतेच्या बलुतेदार व अलुतेदार दिंड्या घेऊन निघत असताना आपण पहातो.

     गावगाड्यात कोळी समाजाचे महत्वाचे योगदान होते.प्रत्येक माणसाला जगण्यासाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते.गावगाड्यात राहत असणाऱ्या बलुतेदार आणि अलुतेदार यांच्या कुटुंबासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून ते पाणी त्यांच्या पर्यंत पखालीने पोहचविण्याचे कार्य हा कोळी करायचा.परंतु शंभर लोकांचे असणारे कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त पाणी पोहचवून होणार नाही.म्हणून त्यातील काही लोक काळीमध्ये बीपेरून शेती करायचे आणि शेती करीत असल्यामुळे पुढे त्यांना कुणबीम्हणून लागले.

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी जे गडकोट किल्ले उभे केले होते.त्या किल्ल्यावर ज्या लोकांची ज्या सैनिकांची राहण्याची सोय छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती.त्या लोकांपर्यंत आणि त्या सैनिकांपर्यंत पिण्याचे पाणी पोहचविण्याची जबाबदारी या कोळी समाजावर होती.त्याचप्रमाणे युध्द काळात लढाई करीत असणाऱ्या सैनिकांना पिण्याचे पाणी देण्याची सोय हा कोळी करीत असायचा.त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी जे समुद्री आरमार उभे केले त्यामध्ये या कोळी बांधवाचा मोठा सहभाग होता.त्यांच प्रमाणे हातात शस्त्र घेऊन स्वराज्याच्या सैन्यात सहभागी होऊन त्याने स्वराज्याची लष्कर वाढवून ते मजबूत करण्यासाठीचे मोठे कार्य केले आहे.त्यामुळे पुढे तो स्वराज्याचा मावळाम्हणून पुढे आला आणि नंतरच्या काळात या मावळ्यालाच मराठाम्हणून संबोधले जाऊ लागले.त्यामुळे मराठा दुसरा तिसरा कोणी नसून तो या बलुतेदार आणि अलुतेदार पैकीच आहेच हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

       प्रबोधनकार ठाकरे यांनी सिंधू संस्कृतीमधून उभा राहिलेला बौध्द धम्म आणि  हां बौध्द धम्म आनंतकाळा पर्यंत टिकून रहावा यासाठी सम्राट अशोक पुत्रांनी उभी केलेले बुध्द विहार, स्तूप,लेण्या डोळ्या समोर ठेऊन कारल्याची लेणी येथील गौतम बुद्धांच्या विचारांची प्रतिमेची आणि महामायेच्या कार्यकौशल्याची ओळख देणारी आणि गौतम बुद्धांना जन्म देण्यासाठी एकटी संघर्ष करणारी महामायालोकामध्ये पोहचविली.अशा ठिकाणी कोळी बांधवांसाठी असणारी कुलदैवत म्हणून एकविराअसे स्थान निर्माण केले आहे.आज ही एकविराहे ठाकरे घराण्याचे कुलदैवत म्हणून त्याला मान्यता आहे.परंतु नंतरच्या काळात कर्मकांड नुसार याठिकाणी चालीरीती करून आर्य सनातनी हिंदू धर्मयाचा पगडा याठिकाणी निर्माण केला गेला आहे.

           आज गावगाडा उभा केलेला कोळी स्वराज्य स्थापनेत सहभागी असलेला कोळी गावगाड्यातून विस्थापित झाल्याचे दिसून येते.समुद्री किनारी मासेमारी करून मुंबईचा रहिवासी आज मुंबई शहरातून मोठ्या प्रमाणात विस्थापित झालेला आहे.मासेमारी करण्यासाठी स्थापन झालेल्या कंपन्यामुळे त्याला मनासारखी मासेमारी करता येत नाही.हा समाज विशेष  मागास प्रवर्गातील (एसबीसी) अनुक्रमांक ४ वर नोंद झालेला असून तो आरक्षित समाज म्हणून ओळखला जातो.... त्याची लोकसंख्या आज तुरळक असल्यामुळे राजकीय पटलावर त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही.त्याच प्रमाणे हा कोळी समाज काही ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील (एसटी) अनुक्रमांक २८,२९,३० वर नोंद झालेला असून तो आरक्षित समाज म्हणून ओळखला जातो.

 
 

स्वराज्यातील दहावा बलुतेदार गुरव होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

गावगाडा हा सिंधू संस्कृतीवर उभा राहिला असल्यामुळे गावगाड्याचा आणि आर्य सनातन हिंदू धर्माचा काही एक संबध येत नाही हे प्रथम आपण समजून घेतले पाहिजे.कारण गावगाड्यात आर्य सनातन हिंदू धर्माने दिलेले ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांचे पूजन होत नसायचे.कारण त्याकाळी यांची निर्मिती झालेली नव्हती.सिंधू संस्कृतीचा प्रभाव गावगाड्यावर असल्यामुळे मातुसात्तक पद्धत अस्तित्वात असल्यामुळे गावगाड्यात स्त्री शक्तीची मान्यता होती.त्यामुळे सिंधू संस्कृतीत ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांची मंदिरे आढळून येत नाहीत.त्यानंतर गौतमी पुत्र सिध्दार्थ यांच्या काळात सुध्दा ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांची मंदिरे आढळून येत नाहीत.सम्राट अशोक यांच्या काळात सुध्दा ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांची मंदिरे आढळून येत नाहीत.त्यामुळे गावगाड्यात देखील ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांची मंदिरे आढळून येत नाहीत.त्यानंतर तेराव्या शतकात उभ्या राहिलेल्या वारकरी पंथात सुध्दा ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांचे अस्तित्व दिसून येत नाही.

       गावगाड्यात कुलदैवत म्हणून खंडोबाचे पूजन त्याकाळी महार करायचा....त्याच प्रमाणे मरीआई म्हणून भूमातेचे पूजन सुध्दा हा महार समाजच करायचा...कारण तो गावचा प्रमुख प्रशासक वर्ग होता.गावगाडा चालविण्याची जबाबदारी ही त्याची असायची.गावगाड्याने गावात ग्रामदैवत म्हणून भैरोबा याचे मंदिर स्थापन केलेले होते....मात्र या भैरोबाची पूजा करायचा मान गावगाड्यातील बलुतेदार क्रमांक नऊ म्हणजे गुरवसमाजाकडे असायची.गावातील कार्यक्रमांचे निमंत्रण देण्याची जबाबदरी सुध्दा गुरवसमाजाकडे असायची.म्हणजेच काय...तर गावगाड्यातील दैवक पुजण्याचे काम हे गुरवसमाजाकडे होते.......त्यामुळे गावगाड्यात आपल्याला ब्राह्मण दिसत नाही.

    ब्राह्मण म्हणजे आर्य कोकणात सातव्या शतकात आले आहेत.त्यानंतर आठव्या शतकात रचपुत आलेला आहे.कोकणात आलेल्या ब्राह्मणानी हळूहळू गावगाड्यात वर्णाश्रम धर्म व्यवस्था पेरण्यास सुरुवात केली.हळूहळू गावगाड्यामध्ये रचपुत वस्ती करून राहू लागले...त्यानंतर पैठण येथे या ब्राह्मणी व्यवस्थेने धर्मपीठ उभे केले...तेव्हा संत नामदेव महाराज यांनी या वर्णाश्रम धर्मा विरोधात तेराव्या शतकात वारकरी पंथ स्थापन करून पुन्हा एकदा समताप्रस्थापित करण्याचे कार्य सुरु केले.

     याच वारकरी पंथाला बरोबर घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून उभारलेल्या किल्ल्यावर शिवलिंग मंदिर उभी केली...परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने आज त्या मंदिरावर शंकर कधीही उभा केला.छत्रपती शिवरायांनी किल्ल्यावर कधीही गणपती या देवतेचे मंदिर उभे केले नाही...कारण गणपती ही दैवता त्याकाळी अस्तित्वात नव्हती.त्यामुळे गावगाड्यातील देवतेचे पूजन करण्याचा अधिकार हा गुरव समाजाकडे होता.छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात मावळा म्हणून शस्त्रे हातात घेतली..मावळा झाल्यामुळे त्याला पुढे मराठा म्हणून संबोधले जाऊ लागले.

    आज गावगाडा उभा केलेला गुरव स्वराज्य स्थापनेत सहभागी असलेला गुरव गावगाड्यातून विस्थापित झाल्याचे दिसून येते.राज्यात मुठभर समाज म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे.हा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) अनुक्रमांक ४३ वर नोंद झालेला असून तो आरक्षित समाज म्हणून ओळखला जातो.... त्याची लोकसंख्या आज तुरळक असल्यामुळे राजकीय पटलावर त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही.

स्वराज्यातील नववा बलुतेदार परीट होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


            सिंधू संस्कृतीच्या आधारावर जंगलातील लोकांनी गावगाड्याची निर्मिती केली आहे हे आपण आतापर्यंत समजून घेतले आहे.गावगाड्यातील काळी आणि पांढरी म्हणजे काय हे देखील आपण समजून घेतली आहे.सिंधू संस्कृतीच्या आधारावर स्त्री शक्तीला सन्मान देण्याचे काम इथल्या महापुरुषांनी केलेले आहे.सिंधू संस्कृतीवर आर्यांनी आक्रमण करून येथे सनातन धर्म व्यवस्था उभी केल्याचे आपण समजून घेतले आहे.या सनातन धर्म व्यवस्थेच्या विरोधात गौतम बुद्धांनी विद्वानाची महती,विद्वानांचे विचार आणि सिंधू संस्कृती मधील संघ आणि तेथील मानवतावादी विचार आपल्याला दिलेले आहेत.त्यांचे विचार जगात पोहचविणारे लाखो भिक्कुंची हत्या सनातन धर्म व्यवस्थेने केलेला इतिहास आपल्या समोर आलेला आहे.सम्राट अशोक पुत्रांनी संपूर्ण भारतात उभारलेल स्तूप,विहार,लेण्यामुळे गौतम बुद्धांचे विचार आजही टिकून आहेत.पंढरपुरच्या बुध्द विहारातील विठ्ठलाला साक्ष मानून उभा राहिलेला वारकरी पंथ भगवान गौतम बुद्धांनी धारण केलेल्या भगव्या वस्त्राची आजही समतेची साक्ष देत आहे.मानवतावादी विचारांवर उभा राहिलेला गावगाडा एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथयाची साक्ष देणारा बलुतेदार अलुतेदार यांच्या सामाजिक व्यवस्थेची जाण करून देत आहे.

     आजपर्यंत आपण गावगाड्यात प्रमुख असलेला बलुतेदार महार याचेकडे लष्कर असल्याचे समजून घेऊन प्रशासन व्यवस्था सांभाळीत असल्याचे पहिले आहे.संत चोखामेळा समजून घेतला.बलुतेदार क्रमांक संत भोजलिंग काका सुतार समजून घेतले आहेत.बलुतेदार क्रमांक चार मधील संत रोहिदास समजून घेतले आहेत.पाचवा बलुतेदार कुंभार समाजातील  गोरा कुंभार समजून घेतला आहे.सहावा बलुतेदार न्हावी समाजातील संत सेना न्हावी समजून घेतला आहे.तर सातवा सोनार समाजातील संत नरहरी सोनार समजून घेतला आहे.छत्रपती शिवरायांचे हेरगिरी खाते सांभाळणारा जोत्शीसमजून घेतला आहे.

      एकंदरीत काय......तर आपण गावगाड्यातील बलुतेदार यांचे योगदान समजून घेऊन त्यांनी उभारलेली कुटुंब व्यवस्था समजून घेतली आहे.तसेच त्यांनी निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था समजून घेतली आहे.एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होणारा बलुतेदार समजून घेतलेला आहे.घर,वस्ती,वाडे,इमले उभारणीत असलेले योगदान समजून घेतले आहे.शेती व्यावसायात बलुतेदार यांचे असलेले योगदान समजून घेतले आहे.आज आपण नववा बलुतेदार म्हणजे परीटसमजून घेणार आहोत.गावगाड्यातील बलुतेदार व अलुतेदार यांच्या घरी लग्न समारंभात कपडे धुवण्याचे काम तो करीत असे...लग्न मंडपात नवरा नवरीच्या मध्ये चांदवा धरण्याचे तो काम करीत असे.एखाद्या बलुतेदार अलुतेदार यांच्या घरात कोणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या घरातील सुतकाचे कपडे धुवण्याचे काम तो करीत असे...परंतु या कामात शंभर लोकांचे असलेले कुटुंब या उदरनिर्वाह चालत नसे.त्यामुळे त्यातील काही लोक पुढे येऊन काळीमध्ये बीपेरून शेती व्यवसाय करून कुणबीझाले.छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्यात सहभागी होऊन स्वराज्यासाठी शस्त्रे हातात घेऊन स्वराज्याचे मावळे झाले......पुढे तेच मावळे मराठा झाले.

     आज गावगाडा उभा केलेला परीटतो त्या गावातून विस्थापित झालेला आहे....राज्यात मुठभर समाज म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे.हा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) अनुक्रमांक १२५ वर नोंद झालेला असून तो आरक्षित समाज म्हणून ओळखला जातो.... त्याची लोकसंख्या आज तुरळक असल्यामुळे राजकीय पटलावर त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही.