Wednesday, February 29, 2012

हास्यमैफल आणि प्रबोधन

विदर्भ वऱ्हाडातील बोली भाषा, बोली भाषेतून आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या, कापूस पिकाची कोंडी, ग्रामीण तरूणाईचे प्रश्न आणि त्याला प्रमाण भाषेतील गेय गझलांचा श्रृगांरिक तडका, असा एकूण हास्य, विनोद आणि त्यातून अंतर्मुख करणारा माहौल, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचं वैशीष्टय ठरला. अस्सल ग्रामीण प्रतिभांचा महाराष्ट्र सदनाच्या व्यासपीठावर उमटलेला ठसा अनेक दिवस स्मरणात राहणार आहे हे निश्चित.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात युवाकवी संमेलन घेण्यात आले.

विविध काव्यसंमलेन गाजविणारे, कवीतेसाठी विविध पुरस्कार मिळालेले पाच प्रतिभावान कवींचा संच प्रा. रूपेश कावलकर यांच्या सूत्रसंचालनात ही काव्यसंध्या रमली. यामध्ये सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी किशोर मुगल, संतोष खडसे हास्यव्यंगाचे सादरकर्ते प्रा. प्रवीण तिखे, गझलकार पुनीत मटकर आणि प्रसिद्ध कवी प्रा. रूपेश कावलकर यांचा समावेश होता. या सर्वांनी दोन तास हास्यची कारंजी महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीत रूजवली.

वऱ्हाडी कवींनी सजविलेल्या मैफीलीमध्ये प्रेम, विरह, व्यंग, दु:ख, व्यथा, जीवनातील अनेक रंग यांवर आधारित कवितांचा समावेश होता. वऱ्हाडी भाषेत सादर झालेल्या कवितां उपस्थित प्रेक्षकांना अंतर्मुख करणा-या ठरल्या. 

मराठीमध्ये असलेल्या प्रांतवार भाषा रचनेवर आधारित कवी संतोष खडसे यांची 


माय मराठीची बोली आहे लयी भारी.....
वऱ्हाडीच आहे त्याला अस्तर......

या कवितेला रसिकांनी विशेष दाद दिली. 

पांढर सोनं पिकविणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर शेतकाऱ्यांच्या पत्नीच्या वेदनचे वर्णन करणा-या कवी पुनीत मेटकर यांच्या कविते ने श्रोत्यांचे डोळे पाणावले. 

भरल्या वाटयावर कपाळयावरं कुंकु मोडल.....
अर्ध्या वाटेवर धनी तुम्ही गेले सोडुन ......
अईन मीरगाच्या वेळी ......
डोळयात आल पाणी...

सरळ, साध्या, छोटया-छोटया पण आशयपुर्ण असणा-या कवितां श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत होत्या. 

घरी टि.व्ही. ले लावला केबल.......
तवा घरातील समदे पॅनल झाले खुश......
भातात निघे केस, भाजीत नसे मीठ
भाकरीत नसे पीठ.....
हे किशोर मुगल यांच्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या जाहिरातींचे विडंबन सर्वाना खुप भावले. 
प्रा. प्रवीण ‍तिखे यांनी यावेळी सादर केलेले मॅराथॉन किस्से हसता हसता पुरेवाट लावणारे होते. मंच संचालक रूपेश कावलकर यांनी सुशिक्षित तरूण शेतकऱ्यांच्या अंतर्मनातील वेदना आपल्या मुक्तछंदात बांधल्या ...... नव्या प्रतिभेतून साकारलेल्या या नव्या कल्पना उप‍स्थितांची दाद मिळवून गेल्या. हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या या काव्यसंधेला दिल्लीतील मराठी बांधवासोबतच अन्य भाषिकांनीही चांगलीच दाद दिली. 


  • अंजु कांबळे 
  • स्वप्न निर्मल जिल्हयाचे

    शासनाची लोककल्याणकारी अभियाने आणि मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात सातारा जिल्हा सदैव अग्रस्थानीच असतो. जिल्हयातील जनतेनं ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त अभियान, महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान, निर्मलग्राम अभियानात सर्वोत्कृष्ट काम करुन सातारा जिल्हयाचे कर्तृत्व राज्यातील जनतेला दाखवून दिले आहे. आज सातारा जिल्हयात निर्मल ग्रामसाठी १ हजार ४९६ गावांपैकी १ हजार ४३१ गावे निर्मल झाली असून केवळ ६५ गावे निर्मल व्हायची बाकी आहेत. नजीकच्या काळात ही ६५ गावे निर्मल करुन संपूर्ण सातारा जिल्हा निर्मल जिल्हा घडविण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाचे लोकशिक्षण आणि निर्मलग्रामचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. याकामी लोकप्रतिनिधीबरोबरच पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थही सक्रीय झाले आहेत.

    संपूर्ण सातारा जिल्हा निर्मल जिल्हा घडविण्यासाठी ६५ गावे निर्मल व्हायची बाकी असल्याने जिल्ह्याचे निर्मलचे स्वप्न अपुरे राहिले आहे. तरीही निर्मलच्या बक्षिसापोटी जिल्ह्याला आजअखेर १४ कोटी ५६ लाख रुपये मिळाले असून, बक्षिसाच्या रकमेतून गावागावांत नवनवी विकासकामे राबविली जात आहेत. या भरीव बक्षिसामुळे गावांच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. यापुढेही निर्मलग्राममध्ये भरीव काम करुन बक्षिसाची अधिकाधिक रक्कम मिळविण्याच्यादृष्टीने सर्वजण गतीने काम करीत आहेत. 

    जिल्हयाच्या सर्वच गावात आता स्वच्छता अभियान आणि निर्मलग्रामचे सातत्य टिकविण्यासाठी गावागावात प्रबोधन आणि जनजागृतीचे काम प्रभावीपणे होत आहे. कोणीही उघडयावर शौचास बसणार नाही यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना आखल्या आहेत, घर तिथं शौचालय उपक्रम जिल्हयात प्रभावीपणे राबविला जात आहे. यासाठी गुडमॉर्निग पथके सातत्यपूर्वक कार्यरत ठेवण्यात आली आहेत, प्रसंगी गावाची स्वच्छता आणि शिस्त मोडणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. याबरोबरच वेयक्तिक शौचालय, ग्रामसभा, चित्ररथ, मशालफेरी, विविध स्तरावरील कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, गुडमॉर्निग पथके अशा विविध मार्गांनी निर्मलग्रामसाठी प्रबोधन आणि लोकशिक्षण केले जात आहे.

    केंद्र शासनाने शंभर टक्के शौचालये असणाऱ्या गावांना २००४ मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार देण्याचे धोरण जाहीर केले. निर्मलग्रामचा सातारा जिल्हयाचा इतिहास पाहता सन २००४-२००५ मध्ये पहिल्याच वर्षी जिल्ह्यातील सहा गावे निर्मल झाली. कोरेगाव तालुक्यातील धामणेर हे जिल्ह्यातील पहिले निर्मलग्राम ठरले. त्यानंतर निर्मलग्रामचा अश्वजिल्हाभर दौडू लागला. दुस-या वर्षी म्हणजे २००५-२००६ मध्ये १०९ ग्रामपंचायती निर्मलग्राम झाल्या. २००६-०७ मध्ये १८६ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. २००७-०८ मध्ये ५०२ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. २००८-०९ मध्ये ५२८ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. २००९-२०१० मध्ये १०० ग्रामपंचायती निर्मल झाल्या. गेल्या ६ वर्षाची निर्मलग्रामची आकडेवारी पाहता फलटण, वाई, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर हे पाच तालुके निर्मल तालुके बनले असून उर्वरित सहा तालुक्यातील केवळ ६५ गावे निर्मलग्राम व्हायची बाकी असून यासाठी जिल्हापरिषद प्रशासनाने आतापासून निर्मलग्रामची विशेष मोहिमच हाती घेतली आहे. विशेष म्हणजे निर्मलग्राममध्ये सातारा जिल्हयातील महाबळेश्वर हा तालुका राज्यातील पहिला निर्मल तालुका ठरला. सातारा जिल्हा निर्मलग्रामच्या उंबरठयावर असून ६५गावे लवकरच निर्मल करुन संपूर्ण सातारा जिल्हा निर्मलजिल्हा करण्याच्या संकल्पाने सर्वजण गतीन काम करीत आहेत.

  • एस. आर. माने
  • Tuesday, February 28, 2012

    पाऊल पडते पुढे

    वर्धा जिल्‍ह्यातील समुद्रपूर तालुक्‍यातील २४९ लोकसंख्‍या असलेले खैरगाव. आपापले नित्य व्यवहार पार पाडण्यापलिकडे येथे फारसे काही घडत नव्हते. परंतु बचतगटाची चळवळ सुरू झाली आणि या गावाची पावलेही पुढे पडायला लागली. 

    या गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या मार्गदर्शनाखाली सुजाता स्‍वयंसहाय्यता महिला बचतगटाची स्‍थापना करण्‍यात आली. गटाच्‍या संघटिका म्‍हणून श्रीमती शोभा झिबलजी गायधने यांची निवड करण्यात आली. शोभा अशिक्षित असल्‍या तरी त्यांच्याकडे जिद्द आणि चिकाटी होती. त्यामुळे त्यांनी रात्रीच्‍या शाळेत जाऊन शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. घरातील कामे, शेतीची कामे, गटाची कामे करुन शोभाताईंनी ४५ व्‍या वर्षी चौथीची परीक्षा पास केली. इच्छा असेल तर शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते हे त्‍यांनी समाजाला दाखवून दिले. 
    शोभाताईंनी गटातून कर्ज घेऊन स्‍वतःच्‍या १२ एकर शेतीमध्‍ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग केला. त्‍यासाठी त्‍यांनी स्‍वतः व गटातील महिलांनी शेतीशाळेत प्रशिक्षण घेतले. सेंद्रीय शेतीमुळे किटकनाशके, रासायनिक खते इत्‍यादीचा खर्च वाचला. शोभाताईंनी स्‍वतः गांडूळ खत, जिवामृत तयार करुन शेतीमध्‍ये त्‍याचा वापर केला. शेतीमधून निघालेल्‍या उत्‍पादनातून त्‍यांनी कृषी प्रदर्शनामध्‍ये विषमुक्‍त अंबाडी शरबत तसेच झुणका भाकरचा स्‍टॉल लावून सक्रीय सहभाग घेतला.

    गटातील महिलांच्‍या सहकार्याने व स्‍वतः पुढाकार घेऊन त्यांनी गावातील तलावावर बंधारा बांधला. गटाचा वाढदिवस, सावित्रीबाई फुले जयंती, महिला मेळावे इत्‍यादी विविध कार्यक्रम गावामध्‍ये पुढाकार घेऊन साजरे केले जाऊ लागले. सुजाता स्‍वयंसहाय्यता बचतगटाच्‍या नावाने शेतकरी वाचनालय स्‍थापन करण्यात आले. आता गावातील शेतकरी देखील येथे जाऊन वाचन करतात. शोभाताईंनी शासनाच्या शेततळे, गोबरगॅस, वृक्षारोपण आदी योजनांचा लाभ घेतला आहे. 
    गटामध्‍ये सहभागी झाल्‍यामुळे माझा आत्‍मविश्‍वास वाढला. मी जे काही करते आहे ते गटाकडून मिळत असलेल्‍या बळामुळे. गटातील सर्व सभासद सुखी समाधानी जीवन जगावेत यासाठी भविष्‍यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगला व्‍यवसाय उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. गटाच्‍या सभासदांना प्रशिक्षण देऊन आणि त्यांच्या साथीने हे स्वप्नही साकार होईल आणि आणखी एक पाऊल नक्कीच पुढे पडेल, असे त्या विश्वासाने सांगतात. 

    स्वयंसिद्धा पौर्णिमाताई सवई

    पौर्णिमाताई विजयराव सवई हे नाव राज्य शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वपरिचित आहे. टाकरखेडा शंभू सारख्या छोट्याशा गावात महिला जागृतीसोबतच महिलांनी शेती क्षेत्रात वळावे याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात सुरू केलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे पौर्णिमाताई सवई ह्या विदर्भातील शेतकऱ्याच्या घरातील रोल मॉडेल ठरल्या आहेत. मिल्क ते सिल्क या त्यांच्या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी सकाळीच टाकरखेडा शंभू या छोट्याश्या गावाला आम्ही पोहोचलो. 

    अमरावती जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात येणारे हे छोटेसे गाव. गावात प्रवेश करताच प्रथमदर्शनी वाडा वजा टुमदार सुंदर घर नजरेत भरते. स्वच्छ व सुंदर परिसर समोर कडूनिंबाचे डेरेदार झाड. अशा या आल्हाददायक वातावरणात सहज पोर्णिमाताई सवई यांच्या घराची चौकशी केली आणि वाड्याच्या समोरच उभ्या असलेल्या पौर्णिमाताईंनी आमचे स्वागत केले. वाड्यातील बैठकीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मोठे तैलचित्र आणि त्यासमोर प्रार्थनेसाठी असलेली बैठक व्यवस्था लक्ष वेधून घेत होती. अर्थशास्त्रात एम.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या पौर्णिमाताईंसोबत, त्या राबवित असलेल्या शेती आणि शेतीला पूरक उद्योग आणि अशा उद्योगात महिलांचा सहभाग कसा वाढेल याविषयावर संवाद साधत असताना त्यांनी सुरू केलेल्या प्रत्येक उपक्रमाबद्दल त्या अभिमानाने सांगायला सुरूवात करतात. 

    एक सधन शेतकरी म्हणून या कुटुंबाची ओळख असली तरी सासऱ्यांसोबत शेतीचे प्राथमिक धडे त्यांनी गिरविले. संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांनुसार त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा ठरविली आहे. राष्ट्रसंतांची प्रार्थना त्या नियमितपणे घेतात. यावेळी गावातील सर्वच नागरिक उपस्थित राहतात. प्रार्थनेनंतर सुरु होतो गावकऱ्यांशी संवाद. शेतीच्या अडचणींसोबतच शेतीतील नवीन प्रयोगांविषयी यावेळी गावकऱ्यांना त्या माहिती देतात. 

    सुरुवातीपासूनच काही वेगळे करण्याची जिद्द बाळगलेल्या पौर्णिमाताई यांचे १९८५ मध्ये सवई कुटुंबात लग्न झाले. १९८७ पासून शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. ३४ एकर शेती असली तरी खारपाण पट्ट्यामुळे ओलीत करणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर निर्सगावर विसंबून शेती करण्यापेक्षा रेशीम शेतीचा पर्याय त्यांनी निवडला. सोयाबीन, तूर, सूर्यफूल आदी पारंपरिक पिकासोबत अडीच एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली आणि त्यासाठी कृषी विभागाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन रेशीम शेतीची संपूर्ण माहिती घेतली.

    महिलांच्या पुढाकारासंदर्भात बोलताना त्यांनी आपली दिनचर्या सांगितली. सकाळी एक तास ध्यान केल्यानंतर ६ वाजता शेतीचा फेरफटका मारुन रेशीम किड्यांच्या संवर्धनासाठी तुतीचा पाला नियमितपणे आणत असल्याचे त्यांनी सांगितले. राहत्या घरातच ३०X३० आकाराचे शेड उभारुन दोनशे अंडीपूंजाचे पालन करण्यात येते. रेशीम कोषापासून महिन्याला सरासरी १७ हजार रुपयांचे उत्पादन होते. रेशीम किड्यांपासून निर्माण होणारे खत व पालापाचोळा तसेच गाईंच्या शेणापासून गांडूळ खत तयार करण्यात येते. यासाठी आधुनिक पद्धतीने १८ बेड तयार करण्यात आले आहेत. एका बेडमध्ये सरासरी १० क्विंटल गांडूळ खत तयार होते. सहाशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे खताची विक्रीसुद्धा घरूनच होते. शेतीला पूरक असणारा दुग्धव्यवसाय, शेतीत गांडूळ खताच्या माध्यमातून तुतीच्या झाडाची लागवड व या झाडाच्या पाल्यापासून रेशीम उत्पादन. म्हणजेच थोडक्यात मिल्क ते सिल्कचा प्रवास पूर्ण होतो. हा प्रवास पूर्ण करताना केवळ एकाच मदतनिसाच्या साहाय्याने आर्थिक उत्पादनात मोठी भर पडू शकते आणि हे सर्व काम महिला म्हणून मी स्वत: करते. याबद्दल निश्चितच महिलांमध्ये उत्सुकता असल्यामुळे हा प्रकल्प बघण्यासाठी अनेक महिला भेट देतात. त्यावेळी आपण करीत असलेल्या कामाचे कौतुक झाल्याचा निश्चितच आनंद मिळतो.

    विदर्भात नैराश्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना अशा कुटुंबांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरु असलेल्या उपक्रमाबाबत माहिती देताना पौर्णिमाताई म्हणाल्या की, घरची महिला घर वाचवू शकते. तसेच ती कुटुंबाला आत्मविश्वास मिळवून देऊ शकते. त्यामुळे विविध गावात जाऊन महिलांसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कुटुंबाशी संवाद साधणाऱ्या ह्या कार्यक्रमात तीन पात्र असून सखाराम हा घरचा कर्ता पुरुष, लक्ष्मी ही त्याची पत्नी आणि वच्छला ही तिची मैत्रीण. नाट्यरुपाने सादर होणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन व संचालन मी स्वत: करते. शेतकरी कुटुंबांना आत्मविश्वास व उर्जा देणाऱ्या या कार्यक्रमाचे विदर्भात २५० ते ३०० प्रयोग पूर्ण झाले आहेत. या संवादातून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी स्वत:चे बियाणे स्वत: तयार करावे याबाबतची तसेच गांडूळ खत, दुग्ध पालन, रेशीम शेतीची माहिती देण्याचा यामधून प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 

    अंजनगाव तालुक्यातील सातेगांवच्या मेळाव्यासंबंधी बोलताना पौर्णिमाताई म्हणाल्या की, एक हजार शेतकरी कुटुंब यावेळी उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. महिला आता शेती व्यवसायाकडे झेप घेत आहेत ही निश्चितच आनंद देणारी घटना आहे. शेती पिकत नाही म्हणून आत्महत्या हाच पर्याय असू शकतो काय? हा प्रश्न उपस्थित करुन आत्मविश्वास जागृत करण्यासाठी राष्ट्रसंतांचा उपदेश त्या येथे सांगतात. आध्यात्म्याने भावना जागृत करताना जीवनात सकारात्मक विचार निर्माण व्हावेत यासाठी ध्यान करा व ईश्वरचरणी विलिन होत आपले कर्तव्यही समर्थपणे सांभाळा, असा उपदेश त्या करतात. दोन ते अडीच तासाच्या त्यांच्या या कार्यक्रमास शेतकऱ्यांकडून मिळत असलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या साहाय्याने संपूर्ण जिल्ह्यात जागृती मेळावे आयोजित केले आहेत. 

    प्रबोधनासोबतच संसारही नीटनेटका असावा याकडे त्यांचा कटाक्ष आहे. त्यांनी शेतीत पारंपरिक बियाण्यांच्या वापरासोबत मिश्र पीक पद्धतीचा अवलंब, गांडूळ खताचा वापर, सेंद्रीय शेतीला प्राधान्य व रेशीम उद्योग प्रसार व प्रचाराच्या कामासोबतच शेतीवर आधारित गांडूळ खत निर्मिती, गांडूळ पाणी निर्मिती, दशपर्णी अर्क, गोपालन व रेशीम शेतीवरील उद्योग त्या यशस्वीपणे राबवित आहेत.

    सिल्क ते मिल्क या उपक्रमासोबत त्यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन आर्थिक संपन्नता मिळविल्याबद्दल राज्य शासनाने त्यांचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांच्या उपक्रमासाठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारासोबतच असंख्य पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. शेतीच्या अर्थशास्त्रात आता त्या पारंगत झाल्या आहेत. त्यांचा अनुभव व जिद्द शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणारी तर ठरणार आहेच, त्याचबरोबर महिलांनाही निश्चितच प्रेरणा देणारी आहे.

  • अनिल गडेकर
  • ग्रंथ वाचनासोबत मनही जुळले


    ‘पुस्तक प्रेमींचा हा सोहळा,
    वाचकांचा हा मेळा,
    ग्रंथोत्सव घेऊन आला.’

    दिल्लीतील ग्रंथोत्सवाने वाचन संस्कृतीत भर पाडली सोबतच येथील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वाचकांचे, प्रकाशकांचे मनही जुळले. महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर चांदण्याच्या सोबतीने ग्रंथोत्सवाच्या सोहळयास सुरूवात झाली. ग्रंथ/पुस्तक प्रदर्शन व विक्रीची वेळ दुपारी ३ ते ९ या कालावधीत ठेवण्यात आली होती. या ग्रंथोत्सवाचे आयोजन वाचनाची अभिरूची निर्माण करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आला. दिल्लीकर वाचक प्रेमींनी या ग्रंथोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला.

    पहिला दिवस सोमवार २० फेब्रुवारी २०१२ सांयकाळी ६.३० वाजता नियोजन आयोगाचे सदस्य, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि प्रख्यात लेखक डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. वाचन संस्कृती वृध्दींगत करण्याचा ग्रंथोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे ते यावेळी बोलले. त्यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला हा उपक्रम दिल्लीतील मराठी वाचक तसेच वाचन संस्कृतीला चालना देणारा प्रगतीशील उपक्रम असल्याचे विदीत केले.

    उद् घाटनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दै. लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सुनील चावकेही उपस्थित होते. त्यांनी आपले विचार व्यक्त करतांना, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री महोदय तांत्रिक क्षेत्रात विशेषज्ञ असूनही मराठी साहित्य अधिक लोंकापर्यंत पोहचाविण्यासाठी ग्रंथोत्सव रूपात अभिनव उपक्रम सूरु केला. त्याबद्दल प्रशंसनीय गौरवद् गार त्यांनी काढले.

    पहिल्या दिवसाला ‘स्वर आराध्य’ या मराठी गीतांच्या मैफलीचा कार्यक्रम ठेण्यात आला होता. रसिक वाचक प्रेमींनी या कार्यक्रमाचा मन मुराद आनंद लुटला.

    दुस-या दिवशी म्हणजे मंगळवारी २१ फेब्रुवारीला ‘बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन’ याविषयावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला. कित्येक वर्षापासून जी मंडळी दिल्लीत अथवा बृहन्महाराष्ट्रात राहतात. तरीही मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन विविध माध्यमाने हे लोक करीत आहेत. त्यामुळे मराठी भाषा वृध्दींगतच होत असल्याचा सूर या परिसंवादात उमटला.

    दिल्ली येथे विविध क्षेत्रात शासकीय तसेच अशासकीय काम करत असूनही मराठी भाषेचे जतन कश्या पद्धतीने ही लोक करीत आहेत त्यांचे अनुभव कथन यावेळी त्यांनी केले. जोपर्यंत ‘आई’ हा शब्द या जगात जिवंत राहील तोपर्यंत मराठी भाषा जिवंत असल्याचेही सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व सूत्रसंचालन अरविंद दीक्षित यांनी केले तर चौगुले विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका पूजा साल्पेकर, माजी प्रशासकीय अधिकारी सचिन भानूशाली, ज्येष्ठ पत्रकार धर्मांनंद कामत, महाराष्ट्र शासनाचे दिल्लीस्थित विधी सल्लागार संजय खर्डे आणि सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी मंगेश वैश्यंपायन यांनी सहभाग घेऊन विचार व्यक्त केले.

    यानंतर युवा कवी संमेलन ठेण्यात आले होते. रूपेश कावलकर आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी व-हाडी तसेच प्रमाण भाषेतील कविता, गझल, चुटकुले सादर करून उपस्थित प्रेक्षकांची दाद घेतली. शेतक-यांच्या समस्या, कापूस पीकाची कोंडी, ग्रामीण तरूणाईचे प्रश्न घेऊन प्रेम, विरह, व्यंग, दु:ख, व्यथा अश्या कविता सादर केल्या.

    विविध काव्य संमेलन गाजविणारे, कवीतेसाठी विविध पुरस्कार मिळालेले पाच तरूण प्रतिभावंत कविंचा संच प्रा. रूपेश कावलकर यांच्या सूत्रसंचालनातील हा कार्यक्रम दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरूणाईच्या पुढील प्रश्नांची उकल करून गेला. यामध्ये सुप्रसिद्ध व-हाडी कवी किशोर मुगल, संतोष खडसे हास्य व्यंगाचे सादरकर्ते प्रा. प्रवीण तिखे, गझलकार पुनीत मटकर आणि प्रसिद्ध कवी प्रा. रूपेश कावलकर यांचा समावेश होता. या सर्वांनी दोन तास हास्याची कारंजी महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीत रूजवली.

    तिसरा व अंतिम दिवस बुधवार दिनांक २२ फेब्रुवारीला गल्ली ते दिल्ली हा अनुभव कथनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी दिल्ली मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे हे होते. या कार्यक्रमात प्रफुल पाठक, क्षमा पाठक, पत्रकार प्रशांत लिला रामदास, अजय बुवा, गिरीश अवघडे, टेकचंद सोनवणे, रश्मी पुराणिक, निवेदिता वैशंपायन यांनी भाग घेतला. दिल्लीत असुनही आपण आपल्या गावातील गल्लीचे आयुष्य कधी विसरू शकत नाही तसेच दिल्ली जरी देशाची राजधानी असली, केंद्रीय मंत्री मंडळ येथे असले, सर्व राजकीय क्षेत्राच्या मोठया घडामोंडी येथे होत असल्या तरी या दिल्लीतही प्रत्येकाने आपली एक गल्ली बनविली आहे. ती गल्ली तो कधीच विसरू शकत नाही.

    ही गल्ली त्याच आयुष्य होते. सुरुवातील येथे आल्यावर खाण्यापिण्याचे होणारे वांदे, भाषेची अडचण, येथील ठगेगिरी, या सर्वांचा अनुभव कथन येथे सांगण्यात आले. दिल्ली राजधानी असल्यामुळे इथला कॅनवास मोठा आहे. विविध राज्यांतील विविध भाषेच्या पत्रकारांशी रोज भेटीगाठी होतात त्यातून समविचारी पत्रकार एकत्र येतात त्यांच्याशी जमलेली गाढ गट्टी, आता ही माणसही आपल्या गल्लीत आली आणि ही गल्ली अधिक रूंद होत असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाची पत्रकारांकडून तसेच उपस्थित प्रेक्षकांकडून मोठया प्रमाणात पसंती देण्यात आली. असा कार्यक्रम वांरवांर ठेवण्यात यावा अशा सकारात्मक सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

    कार्यक्रमाची सांगता अँड. अनंत खेडकर यांच्या मराठी, हिंदी कविता, किस्से व हास्यविनोदांच्या बहारदार कार्यक्रम ‘माझ्याजवळ बसा खुदुखुदु हसा’ ने झाली. त्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात कधी हसून हसून डोळयात अश्रू आणले तर कधी आईच्या आठवणीने हदय भरून आले.

    वीस एकविस बावीस फेब्रुवारी २०१२ हा तीन दिवसीय ग्रंथोत्सव पुस्तकप्रेमींसाठी मेजवानीच ठरला. दिल्लीत महाराष्ट्र शासनातर्फे असा कार्यक्रम आयोजित होणे प्रकाशकासह वाचक प्रेमींकरिता सुखद अनुभव होता. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साजरा करण्यात आला आहे.

    महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमांमुळे दिल्ली येथे मराठी तसेच हिंदी पुस्तक प्रकाशित करणा-या नॅशलन बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, सम्यक प्रकाशन, याशिवाय ग्रंथाली प्रकाशन, रसिक प्रकाशन या प्रकाशकांना विशेष आनंद झाला यामुळे त्यांच्या संस्थेतून प्रकाशित होणा-या पुस्तकांना यामाध्यमाने प्रोत्साहन मिळाले तसेच लोकांपर्यंत त्यांची माहिती गेली. महाराष्ट्र शासनाने प्रथमच उचललेले हे पाऊल भविष्यात मैलाचा दगड ठरेल. हा उपक्रम सातत्याने व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    या ग्रंथोत्सवाने वाचक, वाचन, प्रकाशक यामध्ये जवळीकता निर्माण करून दिली. त्यामुळे वाचक, वाचन, पुस्तक, प्रकाशकांची मनही यामुळे एकमेंकांशी अधिक जुळली.

    अंजु कांबळे

    Saturday, February 25, 2012

    शिवणकलेतून जुळली घरच्‍यांची मने...!

    लग्नापूर्वी शिवणकलेची असलेली आवड आयुष्य घडविण्यासाठी आणि काही कारणांमुळे कुटुंबातील दुभंगलेली मने जुळविण्यासाठीही उपयुक्त ठरली. ही कहानी आहे वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर येथील साधना कांबळे यांची. ढासळत असलेल्या आयुष्याला बचतगटाच्या माध्यमातून आधार मिळाला आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला.

    साधना यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. कसेबसे जीवन जगणे सुरु होते. परिस्थितीमुळे कुटुंबातील व्यक्तींची मने दुभंगलेली होती. त्या आपली कहाणी सांगतात... अशा परिस्थितीत एके दिवशी माविम सहयोगिनींनी मला बचतगटात समाविष्‍ट करून घेतले आणि गटातील सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. नवीन काहीतरी करायला मिळणार या उद्देशाने मी त्‍यांना होकार दिला. काहीतरी केल्याशिवाय घराचे गाडे चालणार नव्हते. त्यामुळे पुढाकार घेण्‍यास मी तयार झाले. गटाच्‍या माध्‍यमाने व सहयोगिनींच्‍या मार्गदर्शनाने मी बँकेचे व्‍यवहार उत्‍तमरित्‍या शिकले. ह्यातून माझा आत्‍मविश्‍वास वाढला. 

    मी लग्‍नापूर्वी शिवणकलेचा कोर्स केला होता. मी ठरविले की, गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन घ्‍यायची आणि स्‍वतःच्‍या पायावर उभे राहून घरच्‍यांची मने जिंकायची. मी शिवणकाम सुरु केले. आता माझा शिवणकामाचा उद्योग चांगला सुरु आहे. उद्योगामुळे घरच्‍या परिस्थितीला आर्थिक पाठबळ मिळाले. घरच्‍या परिस्थितीत सुधारणा व्‍हायला लागली. त्‍यामुळे माझ्याकडे घरच्‍या लोकांचा पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला. मी आता स्‍वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते. गटाचे व्‍यवहार पाहू शकते. घरखर्चात हातभार लावू शकते. या कामी आता पतीचीही चांगली साथ मिळते आहे. 
    बचतगटामुळेच माझा शिवणकलेचा उद्योग सुरु झाला. कपडे शिवता शिवता काही कारणांमुळे कुटुंबातील दुभंगलेली मने जोडली गेली हेच माझे खरे यश आहे.

    स्वयंपूर्ण ग्राम : धोंडेवाडी

    जेमतेम चारशे लोकसंख्या असलेल सातारा तालुक्यातील धोंडेवाडी गाव. परिसर बागायती असला तरी मुळचं गाव जिरायती क्षेत्रातच वसलेलं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या गावानं एकीच्या बळावर जिद्द आणि कष्टाने महात्मा गांधीजीच्या स्वप्नातील खेड घडविण्याचे क्रांतीकारी काम धोंडेवाडीच्या ग्रामस्थांनी करुन साऱ्या जिल्ह्यासमोर स्वयंमपूर्ण गावाचा आदर्श निर्माण केला आहे.

    सातारा शहरापासून अवघ्या २०-२२ किलो मीटर अंतरावर लहानश्या टेकडीवर वसलेलं हे धोंडेवाडी गाव केवळ ७२ कुटुंबाचं असलेल्या गावात एकीचं मोठ बळ लाभल्याने गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा लाभली. गावाचे सरपंच अंकुश घाडगे, उपसरपंच दादा घाडगे यांना शेजारच्या गावचे तरुण कार्यकर्ते माणिकराव शेडगे यांनी स्वत:चा गाव समजून या गावाच्या विकासासाठी सहाय्य आणि प्रोत्साहित केले. त्यांच्या रुपाने धोंडेवाडीच्या गतीमान विकासाला खऱ्या अर्थाने साथ मिळाली.त्यांनी स्वत:चे घर, संसारात थोड लक्ष कमी करुन धोंडेवाडीच्या विकासासाठी सर्वस्व वाहिल. म्हणूनचं धोंडेवाडीच्या तरुण, अबालवृध्द मध्ये त्यांना आदराचं स्थान आहे. 

    १९९१ ला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा बहुमान धोंडेवाडीला लाभला. कोणतीही राजकीय परंपरा अथवा वारसा नसलेल्या धोंडेवाडीकरांनी एकोप्याने गावाचा विकास साधायचा संकल्प केला. त्यानुसार गावातल्या सर्वांनीच विशेष: महिला वर्गांनी ग्रामसभेच्या माध्यमातून एकीचं दर्शन घडविलं गावाचा कोणताही प्रश्न अथवा समस्या असो त्यावर तोडगा काढण्याचं काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेने करुन दाखविले आहे. राज्य शासनाला अभिप्रेत असलेली बळकट ग्रामसभा निर्माण करण्याचं आदर्शवत काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेनं केल आहे. गावाच्या विकासाचे सर्व अधिकार ग्रामसभेला देवून नवा इतिहास धोंडेवाडीने निर्माण केला आहे. त्यामुळेचं धोंडेवाडीमध्ये अलीकडील काही वर्षात सुमारे ७०-८० लाखाची कामे श्रमदान, लोकसहभाग आणि शासन योजनातून झाली आहेत. 

    धोंडेवाडी गावाने श्रमदान, लोकसहभाग आणि शासन योजनातून प्रामुख्याने गावातील अंतर्गत रस्ते, घर तेथे शौचालय गावातील मंदिरे, दत्त टेकडीचा विकास, पाणीपुरवठयाची व्यवस्था, शेतीसाठी पाणी पुरवठा, गोबरगॅस, बचतगटाची चळवळ, निर्मलग्राम, तंटामुक्त अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, बचतगटाची दुध डेअरी, गांडूळ खत प्रकल्प, रेशनिंग दुकान, सोया प्रॉडक्ट अशा विविध उपक्रमातुन स्वावलंबी धोंडेवाडी निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न गावकऱ्यांनी केला आहे. 

    धोंडेवाडी गाव तसं जिरायती पट्टयात मोडत पण या गावकऱ्यांनी अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गुरुनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरु करुन गावाचं सुमारे ३५० एकर क्षेत्र ओलीता खाली आण्‌ून ऊस, ज्वारी, गहू , आलं, सोयाबीन आदी नगदी पिके घेवून आर्थिक बाजूने स्वावलंबी होण्यात यश मिळाविले आहे. येथिल बहादर शेतकऱ्यांनी कष्ट आणि जिद्दीने फुलविलेली शेती पाहताना आनंदाने आणि उत्साहाने एक पाऊल पुढचं पडतं याची जाणीव निर्माण होते. त्यामुळे छोटयाश्या टेकडीवर वसलेल्या धोंडेवाडी गावाला हिरव्यागार शिवारामुळे बेटाचं स्वरुप प्राप्त झालं आहे. 

    संपूर्ण शाकाहारी असणाऱ्या गावानं काही पंरपरा जोपासल्या असून ग्रामसभेच्या माध्यमातून गावाच्या परंपरेला कायदेशीर अधिकार मिळवून दिला आहे. यामध्ये दरवर्षी गोकुळष्टमिला गो महोत्सव हे एक अगळेवेगळे वैशिष्ट आहे. देशी खिलार गाईचे प्रदर्शन भरवून त्यातील तीन क्रमांक पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून निश्चित करुन त्यांना बक्षीसे दिली जातात. तसेच देशी गाईच्या संगोपन आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही बक्षीसे दिली जात आहेत. गावाला अध्यात्माचा मोठा वारसा लाभला असून गावात अनेक भजनी मंडळ असून मुलींचेही स्वतंत्र भजनी मंडळ गावात आहे. यामुळे जनजागृतीचा आणि प्रबोधनाचं मोठ काम या गावात झालं आहे. 

    ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान, पर्यावरण संतुलित ग्रामयोजना यासारख्या शासन योजनातून भरीव निधी गावासाठी खेचून आणण्याचं काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेनं केले आहे. ग्रामस्वच्छता अभियानात गौरवशाली काम करुन निर्मलग्राम घडविण्याचं कामही येथील ग्रामसभेनं केल आहे. घर तेथे शौचालय या मोहिमेतून साडेसहा लाखाचे कर्ज सोसायटीकडून गावकऱ्यांना उपलब्ध देण्याचा एकमुखी निर्णय घेणारी हीच ती धोंडेवाडीची ग्रामसभा गावातील मारुती मंदिरा समोर पारावर या गावाच्या विकासाचं रुप ठरवलं जात आहे. निर्मलग्राम पुरस्कार मिळवून गावकरी शांत बसले नाहीत. त्यांनी गावानजीकच्या दत्तमंदिराचा जीर्णोधार केला. आणि ही दत्तटेकडी वृक्षाछादीत करण्याच्या उद्देशाने या फोडांमाळरान असलेल्या टेकडीवर श्रमदान आणि लोकसहभागातून सुमारे ४००-५०० झाडे लावून सवंर्धन करण्याचे महत्वकांक्षी काम गावकऱ्यांनी केलं आहे. दत्तटेकडी नजीक ५०० मीटरचा रस्ता ही गावकऱ्यांनी पाणदं रस्ता म्हणुन एमआरएजीएस मधुन विकसित केला आहे. त्याबरोबरचं गाव आणि परिसरात वृक्षरोपणांचा आणि सवंर्धनाचं नवा उपक्रम राबविला आहे. 

    गावात महिला सबलीकरणाच्या दृष्टिने ग्रामसभेनं विशेष लक्ष केंद्रित केले असून गावात महिला बचत गटाची चळवळ एक लोकचळवळ म्हणून पुढे आली आहे. गावात महिलांचे १०-१५ बचत गट असून या बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी स्वस्त धान्य दुकान, केरोसिन विक्री, दुध डेअरी, सोया प्रॉक्ट, गांडुळ खत असे विविध अंगी उपक्रम हाती घेतले आहे. त्यामुळे धोंडेवाडीच्या महिलांनी स्वावलंबी आणि आत्मनिर्भयतेच्या दृष्टिने वाटचाल सुरु केली आहे. गावाचा विकास करताना भावी पिढीकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता ग्रामसभेने घेतली आणि शिवाजीराव यादव यांच्या नेतृत्वाखाली शाळासुधार समिती स्थापन करुन शिक्षणांवर लक्ष केंद्रित केले. दोन शिक्षिकी असणाऱ्या या शाळेने विद्यार्थी घडविण्याचं काम चोख बजावून चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शिक्षिक प्रदिप यादव आणि भगवान चव्हाण यंानी अधिकाधिक विद्यार्थी आणण्याचं काम केल आहे.

    गावाच्या विकासाचे सर्व निर्णय गावाच्या मारुती मंदिरा समोरी पारावरच ग्रामसभेच्या माध्यमातून घेवून गावाचा विकास एकाछताखाली करण्याचं काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेनं केल असून एक छोटयागावाने श्रमदान, लोकसहभाग आण शासनयोजनातून आदर्श खेडे निर्माण करण्याचे काम करुन साऱ्या महाराष्ट्रासमोर नवा ग्रामविकास आदर्श निर्माण केला आहे.

    Friday, February 24, 2012

    धरतीवरचा स्वर्ग

    अजिंक्य ता-याच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्हयाची सांस्कृतीक, ऐतिहासिक तसेच पर्यटनाची ओळख साता समुद्रापार झाली आहे. जिल्हयाने विकासाच्या सर्व क्षेत्रात राज्यात गौरव नोंदविला आहे. पर्यटनात तर सातारा जिल्हा संपूर्ण जगाच्या नकाशावर कोरला गेला आहे. सातारा शहरापासून अवघ्या ३० कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरले असून पर्यटकांची रिघ लागली आहे. या पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे ८५० पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे.

    कास पठाराला जाताना सातारा शहरापासूनच घाट सुरू होतो. नागमोडी पण आकर्षक अशा वळणांनी रस्ता माणसांनी फुलून जातो. घाट समाप्त होताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते. हे पठार म्हणजेज कास पठार संबोधले जाते. निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्प पठाराला डोळयांचे पारणे फिटाव्या अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोचत नाही तिथपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे. या पठारावर बोचरा वारा, पाहुण्यांचे विशेषत: पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होत आहे. या पुष्प पठारावरील क्षणात सुर्यकिरणांतील इंद्रधनुष्यीछटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवे-हवेसेपणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात न्हाऊन जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे.

    कास पठारावर जाणारा प्रत्येकजण येथील विविधांगी फुले आणि वनस्पतीकडे आपोआपच आकर्षिला जातो. कास पुष्प पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात. या फुलांवर पसरणा-या इंद्रधनुष्यीछटा पाहण्यास मिळत असून हा परिसर जणु स्वप्नसृष्टीत पोहोचविणाराच ठरतो.

    कास पुष्प पठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे. कास पुष्प पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्था पुढे सरसावल्या आहेत. कास पठार हे १७९२ हेक्टरवर पसरले असून यामध्ये वनखात्याची ११४२ हेक्टर तर खाजगी ६५० हेक्टर जमीनीचा समावेश आहे. साता-याच्या पश्चिमेला ३० कि.मी.वर वसलेल्या कास पुष्प पठारापासून पर्यटनासाठी जगप्रसिध्द असणारे महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ अवघ्या ३० कि.मी. अंतरावर आहे.
    महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री, सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसगिर्क खजिनाच महाराष्ट्राला बहाल केला आहे. सह्याद्री म्हणजे जैवविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. जगातील महत्वाच्या अठरा ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश होतो. कास पठार हा त्याचाच एक भाग असून त्यास कास पुष्प पठार असेही म्हणतात. कास पठाराला सडाही संबोधिले जाते. या सड्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे १२०० ते १३०० मीटर एवढी आहे. या ठिकाणी झाडे उगवत नाहीत. मात्र पावसाळ्यात रानफुले व पुष्पवैभव सर्वांनाच जादूमय भुरळ घालतात. कास पठारावरील लक्षावधी फुले विविध रंगांनी विविध ढंगांनी उगवतात. निसर्गाचे हे देखणं रुप आता सर्वांनाच मोह घालत असून धरतीवर जणू स्वर्गच अवतरला आहे.

    सातारा शहराच्या पश्चिमेला येवतेश्वरचा डोंगर आहे. या डोंगरापासून सुमारे १० कि.मी. अंतरावर कास पठार आहे. या कास पठारावर पावसाळा संपता संपता जुलै ते ऑक्टोंबर या काळात रानफुले येतात. ही रानफुले विविध प्रकारची असतात. हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वा-याची झुळुक आली की डोलणारी पांढरी अशी नानाविध रंगाची फुले अक्षरश: मनमोहून टाकतात. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दर पंधरा दिवसांनी त्यांचे रंग बदलत असतात. काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंत म्हणावा लागेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या पठारावर सुमारे ८५० पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. यामध्ये फॅमिली, जिनेरा जाती आणि औषधी वनस्पती नोंदविल्या आहेत.

    जून महिना संपताच कास पठारावर सड्यावरचा चमत्कार दिसू लागतो. बालकवींच्या शब्दात सांगायचे झाल्यास हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे असं हे देखणं रुप म्हणजे कास पठारावरील पुष्पवैभवच आहे. या पठारावर हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग मात्र आठ-पंधरा दिवसांनी बदलतो. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव डोळ्यांचे पारणे फेडते. या पठारावर जून महिना संपतानाच पांढरे हबे आमरीचे कोंब उगवतात.

    तसेच दोन तु-याची वायतुरा ही वनस्पती दिसते. हीच ती ऍ़पोनोजेटान सातारेन्सिस म्हणजे सातारा कास स्पेशल फूल. लगेचच पिवळी सोनकी आणि कवळयाची मिकीमाऊस सारखी स्मिथियाची फुले उगवतात. मिकीमाऊस फुले ही पिवळया रंगाची असून ही फुले मिकीमाऊससारखी सतत हातात घेऊन मिरवण्याचा मोह येथे येणा-या प्रत्येकालाच आवरता येत नाही.

    श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्ये-मध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृष्य पाहताना प्रत्येकाचे मन हेलावून जाते. या फुलांचा बहर कमी होईपर्यंत पांढरे तुरेवाली आमरी वर येते. मोठ्या तळ्यामध्ये पांढरी छोटी-छोटी कुमुदिनीची कमळे संपूर्ण तलाव झाकून टाकतात. तळयामध्ये जणू साठा करून ठेवल्यासारखी कमळांची फुले असून अलगद एखादा स्नॅप घेऊन तो संग्रही ठेवण्याचा मोह प्रत्येकालाच पडतो. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुले उगवतात.
    काविर्च्या फुलांची झुडपे कास पठारावर मोठ्या प्रमाणावर दर सात वर्षांनी येतात. या फुलांपासून काविर्चा मध मिळतो. काविर्चा मध आयुर्वेदिक म्हणून वापरण्यात येतो. लहान मुले तसेच वयोवृध्द व्यक्ती यांच्यामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी काविर्चा मध अत्यंत उपयुक्त आहे. येथील काही वनस्पती दुमिर्ळ असून काही कीटक भक्षी तर काही वनौैषधी आहेत. दरवर्षी येथे देशी - विदेशी शास्त्रज्ञ फुलांचा अभ्यास करण्यासाठी नियमितपणे येत असतात. एकंदरीत सातारा जिल्हयाच्या वैभवात भर घालणा-या कास पुष्प पठाराचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून आज देशवासियाबरोबरच परदेशी पर्यटकांसाठी कास पठार जीवनातील एक अपूर्व पर्वणीच ठरली आहे. त्यामुळेच कास पठारला भेट देणाऱ्या प्रत्येकालाच कास पठार हे धरतीवरचा स्वर्ग वाटत आहे.


  • एस.आर. माने

  • बालकामगार प्रथा निर्मुलनासाठी लोकसहभाग हवा

    बालकामगाराची प्रथा हा समाजाला लागलेला कलंक आहे. बालकामगारांचे शिक्षण ही सामाजिक गरज आहे. गरीबीमुळे शाळा न शिकणारी मुले/मुली कामधंदा करुन अर्थार्जन करतात. अशी मुलेमुली म्हणजेच बालकामगार होय. बालवयात त्यांना धोकादायक उद्योग, व्यवसायात कामावर न ठेवता त्यांची शारिरीक व मानसिक वाढ होण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकामगार प्रथा निर्मूलन होणे गरजेचे आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे.

    बालकामगार निर्माण होण्यास आईवडिलांचे अडाणीपण, अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्र्य कारणीभूत असतात. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी अर्थार्जन करावे लागते. काही मुले घरी चालू असलेले काम म्हणजेच लोहारकाम, सोनारकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन अशी पारंपारिक व्यवसाय करतात. गाढवावरुन माती वाहून नेणे, विडीकाम, घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा/भंगार वेचणे अशा अनेक धोकादायक उद्योगात ही मुले काम करतात. काही मुलं कारखान्यात काम करतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सामान्यत: बालकामगार मुली या नाईलाजास्तव काम करतात.

    शिक्षणासाठी येणारा खर्च पालकांना परवडणारा नसतो. जो थोडा बहुत पैसा मिळतो तो घरखर्चावर तसेच व्यसनावर खर्च होतो. अनेक मुले कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून निरनिराळ्या वस्तू पुनप्रक्रियेसाठी गोळा करतात. सतत घाणीत काम करुन त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. रोजगाराच्या समस्येमुळे सेवाक्षेत्रासह कारखानदारीतही बालकामगार आढळतात.

    कारखान्याचे मालक व पालकांची बेपर्वाई यामुळे अजूनही विडी उद्योग व वस्त्रोद्योगामध्ये बालकामगार काम करीत आहेत. हॉटेल, बूटपॉलिश, गाडया पुसणे इत्यादि ठिकाणी काम करणारी मुले आजही आढळतात. आपण विविध कामानिमित्त बाहेर जात असतो, अशा बऱ्याच ठिकाणी बालकामगार सर्रास काम करीत असल्याचे निदर्शनास येते. राहण्याची अपुरी जागा, मोठे कुटुंब, व्यसनी पालक या समस्येमुळे मुले धोकादायक उद्योग/व्यवसायात काम करतात.

    समाजामध्ये बालमजूर हा अत्यंत उपेक्षित घटक आहे. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिक्षण घ्यायचे त्या वयात या मुलामुलींना धोकादायक उद्योगात ढकलले जाते. गरीबी, निरक्षरता, अंधश्रध्दा इत्यादी कारणे आहेत. पण यामुळे लाखो मुलांचे जीवन कोमेजून जात आहे. ज्या उद्योग, व्यवसायामध्ये बालमजुरांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणच्या बालकामगारांना कामापासून परावृत्त करुन त्यांचे योग्य पध्दतीने शैक्षणिक पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे.

    बालकामगार प्रथा बंद झाली पाहिजे. त्यांची पिळवणूक थांबली पाहिजे. त्यांचे हरविलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे. केवळ चरितार्थ चालत नाही म्हणून बालवयात कामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांना त्यांचे हरविलेले बालपण परत मिळवून देण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.

    बालकामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. बालकामगार विशेष शाळा चालविल्या जात आहेत. बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य वेगात सुरु आहे. त्यांना शासनाकडून शैक्षणिक व व्यवसाय प्रशिक्षण साहित्य, गणवेश, विद्यावेतन, मध्यान्न भोजन पुरविण्यात येते. बालकामगारांना शाळेची विशेष गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांनी एका ठिकाणी बसावे, अंकांची, अक्षरांची ओळख व्हावी यासाठी आनंददायी वातावरण निर्मिती विशेष शाळेतील कर्मचारी करतात. मुलांच्या कलाने शिकवितात. गाणी, गोष्टी, देशभक्तीपर गीते, परिसरातील माहिती दिली जाते. विविध सण व दिनविशेष शाळेत साजरे केले जातात. त्यांचे हरविलेले बालपण मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

    धोकादायक उद्योग/व्यवसायात काम करणाऱ्या बालकामगारांना या विशेष शाळेत प्रवेश देण्यात येतो. यासाठी शासनामार्फत बालकामगारांचे सर्वेक्षण करण्यात येते. बालकामगार शिक्षणापासून वंचित असतात. त्यांच्या घरी व परिसरामध्ये शिक्षणाचे, स्वच्छतेचे वातावरण नसते. त्यामुळे त्यांच्यावर याबाबतीतील संस्कार करुन, शिकण्याची गोडी लावून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.

    बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहे. उज्वल भारताच्या भविष्यासाठी या मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तरच भारत देश महासत्ता बनू शकतो.


  • इर्शाद बागवान.

  • माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा


    माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
    स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान


    असा अत्यंत पराकोटीचा अभिमान, कळवळा असणारे आणि मराठी भाषेला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आयुष्यभर झगडणारे कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. हाच दिवस मराठी राजभाषा दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो.वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांच्या बहुतेक भाषणांत, लेखांमध्ये मराठी हा विषय समान असे. मराठीवर सर्वच बाजूने होणारे आक्रमण मराठीची शोचनीय परिस्थिती यावर ते वेळोवेळी भाष्य करीत. जागतिक मराठी परिषदेमार्फत त्यांनी समाजात याविषयीची जाण निर्माण केली.

    स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना कुसुमाग्रजांना कधीही मानवली नाही. अनेकांनी त्यांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रयत्न केले. पण वाढदिवसाच्या आधी दोन दिवस ते अज्ञातवासात निघून जात. परंतु त्यांच्या पंचाऐंशीव्या वाढदिवशी मात्र त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रेमाची भेट दिलीच. कुसुमाग्रजांना मुळातच आकाश चांदणे, तारे, तारकांचे वेड होते त्यामुळे अवकाशातील एका ताऱ्यालाच त्यांनी कुसुमाग्रजांचे नाव दिले. स्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री मार्फत दि.२७ फेब्रुवारी १९९६ रोजी स्वर्गदारातील तारा (स्टार इन द गेट ऑफ हेवन्स) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताऱ्याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले. एवढयावरच त्यांचे चाहते थांबले नाहीत तर त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला.

    पारतंत्र्याच्या काळात सर्वच भारतीय भाषांकडे दुर्लक्ष होणे साहजिक होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात विशेषत: भाषाधारित राज्यरचना झाल्यानंतर महाराष्ट्रातच सर्वत्र मराठीला मान खाली घालून चालावे लागते ही परिस्थिती अत्यंत शोचनिय आहे असे कुसुमाग्रजांना वाटे. प्राचीन काळात धर्मभाषा होण्यासाठी मराठीला लढावे लागले. आज राज्यभाषा होण्यासाठी तिला पुन्हा लढावे लागले ही खंत त्यांना होती. १९८९ च्या जागतिक मराठी परिषदेत बोलताना ते म्हणाले होते की,डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात उभी आहे. कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झाली असली तरी तिला अधिक धोका आहे तो लोकभाषा म्हणून तिच्यावर होणाऱ्या आक्रमणांचा. मुंबई हे सर्वाश्रयी शहर आहे. इथे अनेक प्रांतातील लोक येतात, रहातात याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु धनसत्तेच्या बळावर तिला कोणी आपली बटीक करण्याचा प्रयत्न करु नये. मंत्रालयात जाऊन मंत्र्यांशी वा मुख्यमंत्र्यांशी आपण मराठीत बोलू शकतो पण इतरत्र हॉटेलमध्ये, दुकानात आपल्याला हिंदी किंवा इंग्रजीतच बोलावे लागते. कलकत्ता, मद्रास ही शहरेही सर्वाश्रयी आहेत. पण तेथील बहुतांश व्यवहार स्थानिक भाषेत चालतात. परिस्थिती बदलायची असेल तर सामाजिक व्यवहाराच्या क्षेत्रात मराठीचा प्रवेश होणे गरजेचे आहे.

    मराठीसाठी लढणा-या कुसुमाग्रजांनी इंग्रजीचा कधीही द्वेष केला नाही उलट त्यांचे इंग्रजीवर मनापासून प्रेम होते. केवळ जागतिक साहित्याचेच नव्हे तर जगातील ज्ञानविज्ञानाचे दरवाजे इंग्रजीने आपल्याला उघडून दिली आहेत हे इंग्रजीचे ऋण ते मानत. भूतकाळात रुतलेल्या या समाजाला आधुनिकतेपर्यंत नेण्याचे कार्य इंग्रजीने केले असेही ते म्हणत. असे असले तरी शिक्षण क्षेत्रात इंग्रजीची लुडबूड मात्र त्यांना मान्य नसे.

    कविता, नाटक, कथा, कादंबरी, ललित निबंध असे बहुविध साहित्य प्रकार समर्थपणे हाताळून त्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजविले. गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार, अन् वज्रांचे छातीवरती, घ्या झेलून प्रहार ही कविता म्हणजे प्रत्येक देशबांधवाचे मनोगत आहे.त्यांच्या प्रतिभेने कवितेप्रमाणेच नाटकही समृद्ध केले. नटसम्राटने तर सारे उच्चांकच मोडले होते. साहित्य सेवेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे होते. नाशिकचे सार्वजनिक वाचनालय, लोकहितवादी मंडळ यांच्या जडणघडणीत ते सक्रीय होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सहभागी होते. आयुष्याच्या उत्तरार्धात आदिवासींसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्नशील होते. असा मराठीच्या क्षितिजावरील झळाळता तारा दिनांक १० मार्च १९९९ रोजी कायमचा अस्तंगत झाला.

    त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आणि मराठी भाषेच्या विकास तसेच संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने भरीव प्रयत्न केले आहेत. नाशिक येथील कुसुमाग्रज बहुउद्देशीय स्मारकाला पन्नास लाखांची मदत यापुर्वीच केली आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी शासनाने वेगळ्या विभागाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत साहित्य-संस्कृती मंडळामार्फत व्युत्पत्तीकोश, खाद्यकोश, अलंकार आणि भूषणांविषयक कोश, राज्यातील विविध नद्या तसेच सह्याद्री पर्वतविषयक कोश, राज्यातील विविध बोली भाषांविषयक कोश यांची निर्मिती केली जाणार आहे. ग्रंथोत्सव तसेच साहित्योत्सवाच्या माध्यमातून राज्यात तसेच राज्याबाहेरील मराठी भाषिक भागांमध्ये मराठी भाषेचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. विश्वकोश फक्त कोषातच न राहता तो सर्वसामान्य जनता, विद्यार्थी आदी सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी भरीव प्रयत्न करण्यात येणार आहेत.


  • मयुरा देशपांडे-पाटोदकर

  • स्वयंपूर्ण ग्राम : धोंडेवाडी

    जेमतेम चारशे लोकसंख्या असलेल सातारा तालुक्यातील धोंडेवाडी गाव. परिसर बागायती असला तरी मुळचं गाव जिरायती क्षेत्रातच वसलेलं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या गावानं एकीच्या बळावर जिद्द आणि कष्टाने महात्मा गांधीजीच्या स्वप्नातील खेड घडविण्याचे क्रांतीकारी काम धोंडेवाडीच्या ग्रामस्थांनी करुन साऱ्या जिल्ह्यासमोर स्वयंमपूर्ण गावाचा आदर्श निर्माण केला आहे.

    सातारा शहरापासून अवघ्या २०-२२ किलो मीटर अंतरावर लहानश्या टेकडीवर वसलेलं हे धोंडेवाडी गाव केवळ ७२ कुटुंबाचं असलेल्या गावात एकीचं मोठ बळ लाभल्याने गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा लाभली. गावाचे सरपंच अंकुश घाडगे, उपसरपंच दादा घाडगे यांना गावाच्या विकासासाठी सहाय्य आणि प्रोत्साहित केले ते शेजारच्या गावचे तरुण कार्यकर्ते माणिकराव शेडगे, यांनी स्वत:चं गाव समजून माणिकरावांनी धोंडेवाडीच्या गतीमान विकासाला खऱ्या अर्थाने साथ दिली. स्वत:चे घर, संसारात थोड लक्ष कमी करुन धोंडेवाडीच्या विकासासाठी त्यांनी सर्वस्व वाहिल. म्हणूनचं धोंडेवाडीच्या तरुण, अबालवृध्द मध्ये त्यांना आदराचं स्थान आहे.

    १९९१ ला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा बहुमान धोंडेवाडीला लाभला. कोणतीही राजकीय परंपरा अथवा वारसा नसलेल्या धोंडेवाडीकरांनी एकोप्याने गावाचा विकास साधायचा संकल्प केला. त्यानुसार गावातल्या सर्वांनीच विशेष: महिला वर्गांनी ग्रामसभेच्या माध्यमातून एकीचं दर्शन घडविलं गावाचा कोणताही प्रश्न अथवा समस्या असो त्यावर तोडगा काढण्याचं काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेने करुन दाखविले आहे. राज्य शासनाला अभिप्रेत असलेली बळकट ग्रामसभा निर्माण करण्याचं आदर्शवत काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेनं केल आहे. गावाच्या विकासाचे सर्व अधिकार ग्रामसभेला देवून नवा इतिहास धोंडेवाडीने निर्माण केला आहे. त्यामुळेचं धोंडेवाडीमध्ये अलीकडील काही वर्षात सुमारे ७०-८० लाखाची कामे श्रमदान, लोकसहभाग आणि शासन योजनातून झाली आहेत.

    धोंडेवाडी गावाने श्रमदान, लोकसहभाग आणि शासन योजनातून प्रामुख्याने गावातील अंतर्गत रस्ते, घर तेथे शौचालय गावातील मंदिरे, दत्त टेकडीचा विकास, पाणीपुरवठयाची व्यवस्था, शेतीसाठी पाणी पुरवठा, गोबरगॅस, बचतगटाची चळवळ, निर्मलग्राम, तंटामुक्त अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, बचतगटाची दुध डेअरी, गांडूळ खत प्रकल्प, रेशिंग दुकान, सोया प्रॉक्ट अशा विविध उपक्रमातुन स्वालंबी धोंडेवाडी निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न गावकऱ्यांनी केला आहे.

    धोंडेवाडी गाव तसं जिरायती पट्टयात मोडत पण या गावकऱ्यांनी अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गुरुनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरु करुन गावाचं सुमारे ३५० एकर क्षेत्र ओलीता खाली आण्‌ून ऊस, ज्वारी, गहू , आलं, सोयाबीन आदी नगदी पिके घेवून आर्थिक बाजूने स्वावलंबी होण्यात यश मिळाविले आहे. येथिल बहादर शेतकऱ्यांनी कष्ट आणि जिद्दीने फुलविलेली शेती पाहताना आनंदाने आणि उत्साहाने एक पाऊल पुढचं पडतं याची जाणीव निर्माण होते. त्यामुळे छोटयाश्या टेकडीवर वसलेल्या धोंडेवाडी गावाला हिरव्यागार शिवारामुळे बेटाचं स्वरुप प्राप्त झालं आहे.

    संपूर्ण शाकाहारी असणाऱ्या गावानं काही पंरपरा जोपासल्या असून ग्रामसभेच्या माध्यमातून गावाच्या परंपरेला कायदेशीर अधिकार मिळवून दिला आहे. यामध्ये दरवर्षी गोकुळष्टमिला गो महोत्सव हे एक अगळेवेगळे वैशिष्ट आहे. देशी खिलार गाईचे प्रदर्शन भरवून त्यातील तीन क्रमांक पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून निश्चित करुन त्यांना बक्षीसे दिली जातात. तसेच देशी गाईच्या संगोपन आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही बक्षीसे दिली जात आहेत. गावाला अध्यामचा मोठा वारसा लागला असून भजनी मंडळ असून मुलींचेही स्वतंत्र भजनी मंडळ गावात आहे. यामुळे जनजागृतीचा आणि प्रबोधनाचं मोठ काम या गावात झालं आहे.

    ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान, पर्यावरण संतुलित ग्रामयोजना यासारख्या शासन योजनातून भरीव निधी गावासाठी खेचून आणण्याचं काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेनं केले आहे. ग्रामस्वच्छता अभियानात गौरवशाली काम करुन निर्मलग्राम घडविण्याचं कामही येथील ग्रामसभेनं केल आहे. घर तेथे शौचालय या मोहिमेतून साडेसहा लाखाचे कर्ज सोसायटीकडून गावकऱ्यांना उपलब्ध देण्याचा एकमुखी निर्णय घेणारी हीच ती धोंडेवाडीची ग्रामसभा गावातील मारुती मंदिरा समोर पारावर या गावाच्या विकासाचं रुप ठरवलं जात आहे. निर्मलग्राम पुरस्कार मिळवून गावकरी शांत बसले नाहीत. त्यांनी गावानजीकच्या दत्तमंदिराचा जीर्णोधार केला. आणि ही दत्तटेकडी वृक्षाछादीत करण्याच्या उद्देशाने या फोडांमाळरान असलेल्या टेकडीवर श्रमदान आणि लोकसहभागातून सुमारे ४००-५०० झाडे लावून सवंर्धन करण्याचे महत्वकांक्षी काम गावकऱ्यांनी केलं आहे. दत्तटेकडी नजीक ५०० मीटरचा रस्ता ही गावकऱ्यांनी पाणदं रस्ता म्हणुन एमआरएजीएस मधुन विकसित केला आहे. त्याबरोबरचं गाव आणि परिसरात वृक्षरोपणांचा आणि सवंर्धनाचं नवा उपक्रम राबविला आहे.

    गावात महिला सबलीकरणाच्या दृष्टिने ग्रामसभेनं विशेष लक्ष केंद्रित केले असून गावात महिला बचत गटाची चळवळ एक लोकचळवळ म्हणून पुढे आली आहे. गावात महिलांचे १०-१५ बचत गट असून या बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी स्वतधान्य दुकान, केरोसिन विक्रिी, दुधडेअरी, सोया प्रॉक्ट, गांडुळ खत असे विविध अंगी उपक्रम हाती घेतले आहे. त्यामुळे धोंडेवाडीच्या महिलांनी स्वावलंबी आणि आत्मनिर्भयतेच्या दृष्टिने वाटचाल सुरु केली आहे. गावाचा विकास करताना भावी पिढीकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता ग्रामसभेने घेतली आणि शिवाजीराव यादव यांच्या नेतृत्वाखाली शाळासुधार समिती स्थापन करुन शिक्षणांवर लक्ष केंद्रित केले. दोन शिक्षिकी असणाऱ्या या शाळेने विद्यार्थी घडविण्याचं काम चोख बजावून चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शिक्षिक प्रदिप यादव आणि भगवान चव्हाण यंानी अधिकाधिक विद्यार्थी आणण्याचं काम केल आहे.

    गावाच्या विकासाचे सर्व निर्णय गावाच्या मारुती मंदिरा समोरी पारावरच ग्रामसभेच्या माध्यमातून घेवून गावाचा विकास एकाछताखाली करण्याचं काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेनं केल असून एक छोटयागावाने श्रमदान, लोकसहभाग आण शासनयोजनातून आदर्श खेडे निर्माण करण्याचे काम करुन साऱ्या महाराष्ट्रासमोर नवा ग्रामविकास आदर्श निर्माण केला आहे.

    शिवणकलेतून जुळली घरच्‍यांची मने...!

    लग्नापूर्वी शिवणकलेची असलेली आवड आयुष्य घडविण्यासाठी आणि काही कारणांमुळे कुटुंबातील दुभंगलेली मने जुळविण्यासाठीही उपयुक्त ठरली. ही कहानी आहे वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर येथील साधना कांबळे यांची. ढासळत असलेल्या आयुष्याला बचतगटाच्या माध्यमातून आधार मिळाला आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला.

    साधना यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. कसेबसे जीवन जगणे सुरु होते. परिस्थितीमुळे कुटुंबातील व्यक्तींची मने दुभंगलेली होती. त्या आपली कहाणी सांगतात... अशा परिस्थितीत एके दिवशी माविम सहयोगिनींनी मला बचतगटात समाविष्‍ट करून घेतले आणि गटातील सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. नवीन काहीतरी करायला मिळणार या उद्देशाने मी त्‍यांना होकार दिला. काहीतरी केल्याशिवाय घराचे गाडे चालणार नव्हते. त्यामुळे पुढाकार घेण्‍यास मी तयार झाले. गटाच्‍या माध्‍यमाने व सहयोगिनींच्‍या मार्गदर्शनाने मी बँकेचे व्‍यवहार उत्‍तमरित्‍या शिकले. ह्यातून माझा आत्‍मविश्‍वास वाढला.

    मी लग्‍नापूर्वी शिवणकलेचा कोर्स केला होता. मी ठरविले की, गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन घ्‍यायची आणि स्‍वतःच्‍या पायावर उभे राहून घरच्‍यांची मने जिंकायची. मी शिवणकाम सुरु केले. आता माझा शिवणकामाचा उद्योग चांगला सुरु आहे. उद्योगामुळे घरच्‍या परिस्थितीला आर्थिक पाठबळ मिळाले. घरच्‍या परिस्थितीत सुधारणा व्‍हायला लागली. त्‍यामुळे माझ्याकडे घरच्‍या लोकांचा पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला. मी आता स्‍वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते. गटाचे व्‍यवहार पाहू शकते. घरखर्चात हातभार लावू शकते. या कामी आता पतीचीही चांगली साथ मिळते आहे.
    बचतगटामुळेच माझा शिवणकलेचा उद्योग सुरु झाला. कपडे शिवता शिवता काही कारणांमुळे कुटुंबातील दुभंगलेली मने जोडली गेली हेच माझे खरे यश आहे.

    एका एकरात तिळाचे ३५ हजारांचे उत्पन्न

    वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील हळद पिकाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथील शेतकरी यादवराव ढवळे यांनी गेल्या तीन वर्षापासून उन्हाळी तीळ लागवड करुन एका एकरात ३५ ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. या पिकासाठी आलेला खर्च वजा जाता त्यांना ३० ते ३५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

    पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबिनचा पट्टा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्याने शेतकरी प्रामुख्याने सोयाबिननंतर हरभऱ्याचे पीक घेतात. तर ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा आहे ते शेतकरी गहू किंवा भाजीपाला वर्गीय पिके घेतात. परंतु बाजारामध्ये भाजीपाल्यांचे प्रमाण वाढले तर भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती करणे फारसे परवडत नाही.

    अशातच शिरपूर जैन येथील या शेतकऱ्याने उन्हाळी तिळाचे पीक घेण्याचा प्रयत्न केला. इतर पिकाच्या तुलनेत तिळाचे उत्पन्न चांगले आल्यामुळे गत तीन वर्षापासून त्यांनी उन्हाळी तिळाचे उत्पन्न घेणे सुरु केले आहे. त्यांनी आतापर्यंत ऊस व केळीसोबत सुद्धा तिळाचे आंतरपीक घेतले आहे. तीळ हे ९० दिवसांचे पीक आहे. तर, या पिकाचा उत्पादन खर्च सुद्धा अत्यल्प आहे.

    तिळाचे पीक घेण्यासाठी बी-बियाणे, मशागत, पेरणी, रासायनिक खते व युरिया, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास कीटकनाशकाचा एखादा फवारा या सर्व बाबींवर एकरी सरासरी २५०० ते ३ हजार रुपये खर्च होतो. तर, एका एकरामध्ये सरासरी ५ ते ६ क्विंटल उत्पन्न मिळते. बाजारात तिळाला ७५ ते ८० रुपये किलो या प्रमाणे दर आहे. त्यामुळे ढवळे यांना खर्च वजा जाता ३० ते ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

    तीळ पिकाची लागवड ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करावी लागते. लागवडीपूर्व मशागतीच्या कामास आता त्यांनी सुरुवात केली असून सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीळ पिकाची लागवड करावी, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

    Wednesday, February 22, 2012

    समाज संवर्धनासाठी पर्यावरण

    देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. येणारा काळ क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा असणार आहे. संशोधक वृत्ती व विज्ञानाचा कल्पकतेने वापर करण्याची क्षमता असेल तरच यात आपल टिकाव लागू शकणार आहे. हे साध्य करण्यासाठी आजच्या पिढीला घोका आणि ओका या मार्गाने जाऊन चालणार नाही. मुलांमध्ये विज्ञानाची बैठक तयार व्हावी यासाठी शिक्षकांनाही वेगळ्या वाटेने जाऊन नवनवीन प्रयोग करावे लागणार आहे. याच हेतुने राज्य शासनाचा शिक्षण विभाग, विद्या प्रतिष्ठान व एन्व्हॉयर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे ३७ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन व विज्ञान जत्रा २०१२ चे आयोजन करण्यात आले होते. 'समाज संवर्धनासाठी पर्यावरण ' हे या विज्ञान प्रदर्शनाचे ब्रीद होते. 

    पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, प्रदूषणाचे गंभीर संकट आदी समस्या विज्ञानाचा कल्पकतेने वापर करीत कशा सोडवता येतील याची मांडणी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेल्या प्रयोगांमध्ये केली होती. वीजनिर्मितीसाठी नवीन पर्याय, सौर ऊर्जा, वाढती लोकसंख्या व नव्या गरजा यांचा विचार करता कोणत्या सेवा देता येतील यांचाही केलेला विचार बाल वैज्ञानिकांच्या प्रयोगातून दिसत होता. बाल वैज्ञानिकांनी सादर केलेल्या प्रयोगांतून त्याच्या बुध्दिमत्तेची चुणूक दिसून येत होती. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. विज्ञान जत्रेच्या अंतर्गत नेचर वॉक आयोजित केला होता. पक्षीनिरीक्षक डॉ. महेश पाटील, डॉ. महेश गायकवाड व अनुज खरे हे मागदर्शनासाठी यावेळी उपस्थित होते. एन्व्हॉयर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सौ. सुनेत्रा पवार याही यावेळी आवर्जून विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होत्या. आपल्या आसपास नित्याने बागडणारे अनेक पक्षी यावेळी अभ्यासकांनी सर्वांना दाखविले.

    मानवाची क्रांती कशी होत गेली हे आपण पुस्तकांतून वाचत आलो आहोत, परंतु हे संक्रमण या प्रदर्शनात लेझर शोद्वारे दाखविण्यात आले. सूर्यमाला कशी तयार झाली, पृथ्वीची रचना, गरुड, पोपट, घार इ. पक्षी, डॉयनॉसॉर, जगातील सात आश्चर्ये, सॅटेलाईटच्या वापरामुळे बदलून गेलेले जग, कम्प्युटर मोबाईल वापर, प्रयोगशाळांमधील आधुनिक उपकरणे, संगीताची निरनिराळी वाद्ये, महानकाशा इ. विज्ञान विषयक गोष्टी असा साराच पट या शो द्वारे दाखविला गेला.

    प्रदर्शनामध्ये आयोजित केलेल्या नेचर फिल्म फेस्टिव्हलमध्ये पर्यावरण, आसपास दिसणारे पशू-पक्षी, बनस्पतींबाबत मुलांमध्ये प्रेम आणि पालकत्वाची भावना निर्माण व्हावी हा या फेस्टिव्हलच्या आयोजनामागचा आयोजकांचा मुख्य हेतू होता.

    या प्रदर्शन व जत्रेस सिक्कीमच्या २२ सनदी अधिकाऱ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवर मांडलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि त्यांचा आत्मविश्‍वास पाहून ते भारावून गेले. दररोज ५० हजारांहून अधिकजण या प्रदर्शन व जत्रेला भेट देत होते. पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवावर पॅराजंपिंग करणारी जगातील पहिली महिला पद्मश्री पुरस्कार विजेती शीतल महाजन हिने विज्ञान प्रदर्शन व जत्रा पाहण्यासाठी आलेल्या मुलांसोबत गप्पा मारल्या. सिने व नाट्य कलावंत अशोक समर्थ व राहुल कराड यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शरवरी जमेनीस हिने पृथ्वीची व्यथा मांडणारी वसुधात्मिका ही नृत्यसंरचना सादर केली.

    सायन्स फिल्म फेस्टिव्हल, हितगुज शास्त्रज्ञांशी, अनुभव कथन नामवंतांचे, पपेट शो द्वारे विज्ञानाची माहिती, अंधश्रध्देमागील नेमके विज्ञान, निसर्ग व विज्ञान विषयक छायाचित्र प्रदर्शन, नकलाकार अंबादास कलकट्टी यांचा नकलांचा व हास्यदर्पण कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमांचीही रेलचेल या जत्रेत होती. शिवाय अम्युजमेंट पार्क व खाऊ गल्लीचे आयोजन यावेळी केले होते. प्रदर्शन व जत्रेच्या समारोप विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांच्या हस्ते झाला. विज्ञानाची कास, तंत्रज्ञानाची आस व माणुसकीचा ध्यास विसरु नका असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. बुध्दीच्या बाबतीत जगात सर्वमान्य ठरावयाचे असेल तर बुध्दी तितकीच तयारीची ठेवली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. शैक्षणिक पाया पक्का केला पाहिजे व कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. याचा उपयोग देशाला होणार आहे. ही वैज्ञानिक व तंत्रज्ञान क्रांती करत असताना सगळे प्रश्न सोडवताना जगाचे भानही राखले पाहिजे. सगळ्या गोष्टींचे संतूलन राखले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

    श्री गणेशाला आपण 'त्वम ज्ञानमयो विज्ञान मयोसि' असे म्हणतो. त्याचप्रमाणे या प्रदर्शनात छोटे छोटे बालगणेश विज्ञानमय झालेले दिसत होते. ग्रामीण भागात राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केल्यामुळे या भागातील विज्ञान प्रेमी व विद्यार्थ्यांना जवळून पाहता आले. हे पाच दिवस आमच्यासाठी जणूकाही प्रवणीच म्हणावी लागेल. खूप काही पाहता आले. शिकता आले, अशा भावना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. 

  • सुरेखा जाधव 
  • शांततेतून समृध्दी

    गाव विकासासाठी राजकारणाऐवजी समाजकारणाला प्राधान्य देणारे पदाधिकारी, वेळोवेळी ग्रामस्थांना सहकार्य करणारे सचिव, आपलं गाव सदर अग्रेसर राहावे यासाठी हेवेदावे बाजुला ठेवणारे एकत्र येणारे ग्रामस्थ यामुळे गावातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणा-या हनुमान महाराजांच्या साक्षीने ग्राम जामखेडची शांततेतून समृध्दीकडे वाटचाल सुरु केली आहे. 

    गावक-यांनी आपल्याला निवडून दिल ते गावाला विकासाच्या पैलतीरावर नेऊन पोहचविण्यासाठीच गावक-यांचा हा आशावाद नाउमेद न करता काम केले. सरपंच गजानन लोखंडे, उपसरपंच संदीप पोफळे या युवा पदाधिका-यांनी गावातील इतरही राजकीय मंडळीशी वेळप्रसंगी समन्वयाची भूमिका घेतली. गावात आलेल्या कोटयवधींच्या योजनांमध्ये कधी गावातील राजकारणाचा खोडा आला नाही. ७ सदस्य असलेल्या जामखेड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गजानन लोखंडे विराजमान झाले. पदग्रहणापासूनच त्यांनी उपसरपंच संदीप पोफळे, सचिव आर.टी.राऊत, सदस्य रामदास सखाराम करवते, तुकाराम पोफळे, मंसाराम वाघजी भोंडणे, शेवंताबाई कोंडीराम माघाडे, सौ. रेखा सुर्यभान पोफळे, यांच्या साथीने गावविकासासाठी अंतर्गत राजकारण या पक्षीय राजकारण आड न येऊ देण्याची भूमिका घेतली. विविध पक्षातील नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या जवळपास सोडेतीन वर्षाच्या कालखंडात गजानन लोखंडे, व त्यांचे सहकारी गावात कोटयवधींची विकास कामे आणू शकले. त्यातली काही कामे पूर्ण तर काही प्रगतीपथावर व काही सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. महादेव तिवालेंच्या प्रेरणेतून २ लाखाचे सिमेंट क्रॉकीट रस्ते, दिलीपराव जाधवांच्या शिफारशीतून २६ लाखाची पाणीपूरवठा योजना विष्णु पाटील राऊतांच्या प्रयत्नातून ४९ लाखाची पाणलोट विकासाची हरियाली योजना, माजी आ. विजयराव जाधवांच्या प्रयत्नातून ५ लाखांचे सभामंडप, तत्कालीन जि.प.सदस्य स्व.महादेव तिवालेंच्या पुढाकरातून ५ लाखाचे ग्रामपंचायत भवन तयार केले. आ. सुभाषराव झनकांच्या प्रयत्नातून ठक्करबाबा योजनेअंतर्गत १० लाखाची विकास कामे व ५ लाखाचे बजरंगबली संस्थान सभामंडप पं.स. सदस्य गोपाल पाटील राऊत यांच्या प्रयत्नातून वैधानिक विकास मंडळांतर्गत ५ लाखाचे सभामंडप, सिमेंट क्रॉकीट रोड, गरजूंना ७० हजारांच्या बैलगाडी वाटप, शाळा दुरुस्तीसाठी १ लाख, २५ लाखाची घरकुले तर बाजार समिती संचालक गजाननराव देवळेंच्या प्रयत्नातून २३ लाखाचा पांदन रस्ता गावाला मिळवून देण्यात ग्रामपंचायतच्या पदाधिका-यांना आजवर यश आले. ग्रामसचिव व ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या स्वयंप्रयत्नातूनही विकास निधी खेचण्यावरही ग्रामपंचायतने विशेष भर दिला. त्याचाच परिपाक म्हणून १० लाखाचे विकास कामे केली. ३३ लाखाच्या पॅकेज व रोहयो मधून विहीरी आणण्यासाठी जामखेडच्या विकासाभिमुख ग्रामपंचायतला यश आले. निर्मल ग्रामच्या दिशेने वाटचाल करणा-या जामखेडला पर्यावरणपुरक समृध्द ग्राम निर्माण करण्याचा ध्यास लागला आहे. गावातील जागृत हनुमान महाराजांच्या यात्रोत्सवाला सहकार्य करणा-या ग्रामस्थांनी सरपंच लोखंडे उपसरपंच पोफळे व गावातील कर्त्या लोकांच्या मार्गदर्शनातून धार्मिक कार्याबरोबरच गावएकीचे आदर्श उदाहरण घडविले. यात्रोत्सवाच्या सप्ताहात गावातील सात वेटाळांवर दरदिवशी स्वच्छतेची जबाबदारी टाकतांना सरपंच उपसरपंचासह कत्या मंडळीनी स्वच्छतेत अग्रक्रम घेणा-या गाववेटाळातील स्वच्छतादुतांना बक्षीस योजनाही जाहीर केली आहे. गाव विकासासाठी सदैव कटीबध्द राहू असे मत सरपंच लोखंडे व उपसरपंच पोफळे यांनी बोलतांना व्यक्त केले.

    सर्वधर्म समाभावाचे प्रतीक

    कारंजा अमरावती या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नारेगावापासून दोन कि.मी. अंतरावर लोणी (अरब) हे गाव आहे. लोणी मध्ये कुणबी, मुस्लीम आणि बौध्द समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असून, येथे मंदिर, मशीद आणि बौध्द विहार ही धार्मिक स्थळे आहेत. परिणामी, सर्वधर्म समभाव आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणून या गावाची परिसरात ओळख आहे. ग्रामस्थांचा एकोपा आणि ग्राम पंचायत प्रशासनाची दूरदृष्टी यामुळे आजघडीला गाव विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. गावात खाकीनाथ महाराजांचे मोठे मंदिर आहे. या ठिकाणी पौष महिन्याच्या पोर्णिमेला मोठी यात्रा भरते. 

    येथील ग्राम पंचायत सदस्य संख्या सात आहे. १२०० च्या जवळपास लोकसंख्या आहेत. सरपंचपदी रमेश तिडके आहेत. सौ. मेहरनिगारबी ज. रजाऊल्लान खॅ पठाण उपसरपंच आहेत. ग्राम सचिवपदी योगिराज शंकरपुरे कार्यरत आहेत. गावामध्ये बारावा वित्त आयोगा मधून नळ योजना विहिरींचे खोलीकरण नाली बांधकाम, जिल्हा परिषद फंडातून आरोग्य उपकेंद्र बांधकाम, पंचायत समिती स्तर बाराव्या आयोगामधून काँक्रीट रस्ता, सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत दोन शाळा खोल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. गाव ८० टक्के हागणदारीमुक्त झालेले आहे. मागसवर्गीय आणि इतरांकरिता घरकुले प्रस्तावित केलेली आहेत. गावात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शाळा आहे. शिवाय उर्दू शाळाही आहे. 

    लोणी अरब येथून मुंगूटपूर, वाढोणा, कार्ली, यावर्डी आदी गावाकडे जाणारे डांबरी रस्ते आहेत. झोपडपट्टीमध्ये दुहेरी हातपंप, योजना नाल्यांचे रुंदीकरण, सोबतच निर्मल ग्राम योजना राबविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गावात महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी मोतीराम वानखडे आणि पोलीस पाटील रन्तमाला आंधळे यांचे सहकार्य मिळत आहे. सरपंच उपसरपंच आणि ग्राम सचिवासह ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे गावाचा विकास होत आहे. 

    करू या कुपोषणावर मात

    अलिकडेच आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कुपोषणाविषयी जी चिंता व्यक्त केली ती सर्व भारतीयांना विचार करायला लावणारी आहे.कुपोषण निर्मूलनासाठी शासनाबरोबरच जनतेचा सहभागही अत्यंत महत्वाचा आहे.

    कुपोषण कशामुळे होते व निर्मुलन कसे केले जात आहे,हे लोकप्रबोधनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.ज्यांना कुपोषण निर्मितीची व निर्मूलनाचे उपाय समजले त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना, कुटुंबांना सांगावे हाच या लेखाचा उद्देश आहे.

    कुपोषणाची कारणे : 
    कमी वयात मुलींचे लग्न होणे, गर्भधारणा झाल्यानंतर त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क न साधणे, मातेच्या प्रसुतीपूर्वी व प्रसुती पश्चात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे, जन्माला येणारे मूल अशक्त व कमी वजनाचे असणे, वारंवार होणारे बाळंतपण, मूल जन्मत: एक तासाच्या आत स्तनपान न करणे, स्तनपान न देणे किंवा अपुरे देणे, बाळाला सहा महिने झाल्यानंतर पुरक आहार न देणे अथवा खूप उशिरा देणे, आहार विषयक व मुलांच्या पोषणाविषयी माहिती नसणे, कुटुंबात अपुरा व कमी प्रतिचा आहार असणे, अस्वच्छता, गैरसमजूती उदा.अंधश्रद्धा, बुवा किंवा वैद्यांकडून उपचार करण्यावर विश्वास, संसर्गजन्य आजार उदा. अतिसार, गोवर इ. आजारामुळे बालकांचे वजन कमी होवून कुपोषणाच्या श्रेणीत जाणे, गरिबी, बेरोजगारी, साक्षरतेचा अभाव, अंगणवाडीतून मिळणाऱ्या पुरक पोषण आहाराव्यतिरिक्त लाभार्थ्यांना त्यांच्या घरातून आवश्यक पुरेसे अन्न न मिळणे आणि समाजाचा सहयोग नसणे इ.कारणांमुळे बालकांचे कुपोषण होते.

    कुपोषण निर्मूलनासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरु आहेत. त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे :
    ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांना सुक्षपोषकत्व युक्त आहार (Take Home Ration) देण्यात येत असून ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना महिला बचत गट/महिला मंडळ यांच्यामार्फत सकाळचा नास्टा, गरम ताजा आहार पुरविला जात आहे. 

    कुपोषित बालकांची दर पंधरवाड्याला नियमित आरोग्य तपासणी, वैद्यकीय उपचार, बालकांचे लसीकरण, स्तनपान व शिशु पोषणावर भर देण्याबाबत व समुदाय वृद्धीपत्रकाद्वारे पालकांमध्ये जाणीवजागृती निर्माण करणे यासाठी उपाय योजना पुढीलप्रमाणे केल्या जात आहेत.

    • ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे १०० टक्के सर्व्हेक्षण करण्यावर भर दिला जात आहे.
    • तीव्र कमी वजनाच्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रामध्ये दाखल करुन त्यांना अतिरिक्त पोषण आहार व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविले जाते. जनजागृती करण्याकरिता अंगणवाडी स्तरावर दरमहा माता बैठकींचे आयोजन केले जाते.
    • नवजात बालकाला अर्ध्या तासाचे आत स्तनपान देण्याकरीता जनजागृती केली जात आहे. 
    • वयोगटानुसार लसीकरण करुन बालकांचे आजारापासून संरक्षण करणे.
    • योग्य मात्रेनुसार जंतनाशक औषधीचे वाटप करणे.
    • अंगणवाडीतील बालकांची दर तिमाही आरोग्य तपासणी करणे.
    • तीव्र कमी वजनाच्या बालकांची तसेच वजनवाढ नसलेल्या बालकांची नियमित आरोग्य तपासणी करणे.
    • बालरोग तज्ज्ञांमार्फत तीव्र कमी वजनाच्या बालकांची तपासणी करणे सुरु असून ग्राम बाल विकास केंद्र, बाल विकास केंद्र सुरु करण्यावरही भर देण्यात आलेले आहेत.
    • तसेच उपरोक्त उपाययोजनांमुळे दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाणे कमी होत आहे.

    शासनाच्या प्रयत्नाबरोबरच समाजातील सर्व घटकांचे योगदान कुपोषण निर्मूलनाच्या कामी मिळाले तर या गंभीर समस्येचे पूर्णपणे निर्मूलन लवकरच शक्य होईल.

    राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान शासनाने मागील वर्षी हाती घेतले आहे. त्यात जनतेचा व गावकऱ्यांचा सहभाग वाढावा म्हणून गावांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. उद्देश हाच आहे की लोकांनीही या कामी पुढे यावे.

    कळवण मध्ये मध उत्पादनात यश

    आदिवासी भागाच्या विकासासाठी बचत गटाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध प्रयत्नांचे मधु फळ आता मिळू लागले आहे. नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात मध उत्पादनात मिळालेले यश लक्षात घेऊन एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने नोव्हेंबर मध्ये शुद्ध मध उत्पादनाचे एक स्वतंत्र युनिट सुरु करण्यात येणार आहे. 

    कळवण तालुक्यातील चणकापूर धरणाच्या पायथ्याशी बिलवाडी हे छोटेसे गाव आहे. महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत गावात सहा बचतगट सुरु झाले आहेत. तोपर्यंत शेती व जोड व्यवसाय करणे यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. बचत गटाच्या माध्यमातून शेतीला पूरक अशा मध उत्पादन क्षेत्रात शिरकाव करताना या महिलांची ओळख महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी ज्योती निंभोरकर यांच्याशी झाली. निभोकर यांनी तळेगांव दाभाडे येथून २०११ मध्ये २२ मध कॉलनी (पेट्या) या बचत गटाला दिल्या. या पेटीसाठी बचत गटाने १० हजार रुपये जमा केले, तर महामंडळाने ९० हजार रुपयांची मदत केली. पेटीत एक राणी माशी व बाकीच्या सेवेकरी माशा असतात. या पेटीसोबतच मध काढण्याचे यंत्र, ॲपिक्स सेराइं‍डिका या जातीतील मधमाशी, जाळी यांसह इतर साहित्य देण्यात आली. यासाठी एका पेटीमागे प्रत्येकी साधारणत: ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. 

    महामंडळाच्या वतीने बिलवाडी, देवळीवण, बौरदैवत, बेटकीपाडा, चिंचवाडा या गावातील ३० महिलांना मध तयार करण्याचे साहित्य देण्यात आले. सेंट्रल बी रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने त्यांना तीन दिवसांचे कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. महिलांनी प्रशिक्षण मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या कामकाजाचा श्रीगणेशा केला. 

    सकाळी मधपेट्यांचे निरीक्षण करणे, साधारणत: काल जेवढ्या माशा होत्या, तेवढ्या आहेत की नाही हे पाहणे ही कामे महिलांकडून केली जातात. मधमाशा मधपेट्यांपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर पराग कण शोधत फिरतात. त्या एक किलोमीटरच्या आवारातच फिराव्यात यासाठी त्यांनी कांद्याच्या शेतीतच हा उपक्रम राबविला. कांदा बीजात मोठ्या प्रमाणावर परागकण असल्याचा फायदा होणे, हे ही एक कारण यामागे आहे. एका हंगामात सुरुवातीच्या काळात चार महिन्यामध्ये कमीत कमी दोन किलो मध मिळतो. याशिवाय एका पेटीतून चार किलो मेण मिळते. मध बनण्याची प्रक्रिया सुरु असताना त्या पेट्यांना मुंग्या लागू नयेत, ही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सुरुवातीपासूनच पेटी ज्या स्टॅन्डवर असते, त्यांचे पाय पाणी असलेल्या चार वाट्यांमध्ये ठेवले जातात.

    महामंडळाने प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र पेटी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. हा खर्च त्या व्यक्तीने स्वत: करावयाचा आहे. यामुळे बचत गटाच्या स्वत:च्या मालकीच्या जादा पेट्या तयार होत आहेत. बचत गटाने आपले पहिले उत्पादन मिळविले असून ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र बाजारपेठेत त्याचे मूल्य वाढावे यासाठी मंडळाच्या व्यवसायवृद्धीसह केंद्रात नि:शुल्क पॅकेजिंग केले जाते. कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता मधाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. शुद्ध स्वरुपातील हे मध नाशिक येथील महिला आर्थिक विकास महामंडळ येथे उपलब्ध आहे. तेथील संपर्क क्रमांक ०२५३-२५८०६०८ असा आहे. 

    सदर मध निर्मिती ही चार महिन्यात होते. एका पेटीच्या मधातून ३ हजार रुपये उत्पन्न मिळते. कळवण आदिवासी विभागात सुरु केलेल्या या ५ गावातील बचतगटांना दिलेल्या २२ पेट्यांमधून प्रथम हप्त्यात ६६ हजार रुपये उत्पन्न झालेले आहे. हा शेतीपूरक व्यवसाय असल्याने याचा लाभ शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, बचतगट यांनी घेतल्यास ते सर्वांच्या हिताचेच ठरेल हे खरे.

  • अशोक साळी
  • योग्य व्यवस्थापनामुळे टोमॅटोचे विक्रमी उत्पादन

    भारत कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करुन पिकांचे योग्य नियोजन केले तर टोमॅटोसारख्या बेभरवशाच्या पिकातूनही विक्रमी उत्पादन घेता येते. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील राजपूर येथील दत्ता सानप यांनी हा प्रयोग यशस्वी करुन सहा महिन्याच्या हंगामात साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. 

    राजापूर येथील एस.टी.वाहनचालक नामदेव सानप यांचा दत्ता हा मुलगा. इंग्रजी विषयात पदवी घेतल्यानंतर तो शेतीमध्ये रमत आहे. दत्ताने अनेक नवीन प्रयोगही शेतीत राबविले. येवला तालुका हा तसा अवर्षणग्रस्त भाग. सानप यांनी अशा परिस्थितीत टोमॅटो लावण्याचे निश्चित करुन १३८९ या वाणाचे रोपे घेतली. सहा हजार पाचशे रोपे घेऊन त्यांनी एक एकर क्षेत्रात साडेतीन बाय दीड फूट अंतरावर रोपांची लागवड केली. लागवडीच्या वेळेस युरिया व सुपर फॉस्फेट या खतांची मात्रा दिली. पुन्हा २१ दिवसांनी २४:२४:० हे खत तर ४० दिवसांनी युरिया, सुपर फॉस्फेट व एमओपी ही खते सरी फोडून दिले. रांगाच्या प्रकारानुसार सुमारे सात वेळेस बुरशीनाशक व कीटक नाशकासह पोषकांच्या संतुलित फवारण्या करुन विशेष दक्षता घेतली. 

    लागवडीनंतर पाचव्या सहाव्या दिवशी पाणी दिले. या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाणी टंचाई जाणवू लागली. तेव्हा सानप यांनी ठिबक संच खरेदी करुन ठिबक सिंचनाद्वारे दररोज एक तास पाणी तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करुन टोमॅटो पिकांची २५ टक्यांपर्यत गुणवत्ता वाढविली. झाडांची वाढ होऊ लागल्यावर चार वेळेस सुतळीने बांधणी केली.

    ज्यावेळी बाजारभाव १५ ते ४० रुपये कॅरेटप्रमाणे झाले त्यावेळी इतर शेतकऱ्यांनी टोमॅटोकडे दुर्लक्ष केले. परिणामी त्यांची बाग खराब झाली. काही शेतकऱ्यांनी तर बागा काढून दुसरे पीक घेतले. मात्र सानप यांनी पाणी, खत व फवारणीच्या व्यवस्थापनात सुसूत्रता व सातत्य ठेवून प्रतिकूलतेतही बाग टिकवून ठेवली. झाडांची निगा राखल्याने एक एकरात सुमारे १ हजार पाचशे कॅरेट टोमॅटोचे उत्पन्न निघाले. 

    सदर टोमॅटोची पिंपळगांव, सटाणा, येथील बाजारात तीन प्रकारात प्रतिवारी करुन विक्री केली. संपूर्ण हंगामात सानप यांना प्रत्येक वेळी वाढीव भाव मिळाला. त्यांना सरासरी २२५ रुपये कॅरेट प्रमाणे भाव मिळाला. त्यामुळे विक्रमी उत्पन्न मिळाले. या कामी कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

    हे टोमॅटोचे उत्पादन घेताना येवल्याचे तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले. टोमॅटोच्या पिकातून मिळणारे उत्पन्न हे बाजारभावावर अवलंबून असते मात्र पिकांची निगा राखून अधिक उत्पादन घेता येते. ही किमया दत्ता सानप यांनी करुन दाखविली. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. 

  • अशोक साळी