Monday, March 5, 2012

दुग्ध व्यवसाय ते वनसंरक्षण : युवा अभियंत्याचा प्रवास


मेळघाटात फिरताना येथील गवळी बांधवांच्या व्यथा मी ऐकल्या होत्या. गोधनाला परमेश्वराप्रमाणे जपणारा हा समाज. पण उन्हाळ्यात हिरवा चारा मिळत नसल्याने रडकुंडीला आलाय. एकीकडे भाकड गुरांची संख्या वाढली, दुसरीकडे गावानजिक जंगलातील चारा कमी झाला. गवताची जागा रायमुनिआ, रानतुळस व तरोट्याने व्यापली. संक्रांत झाली की मग हे गवळी बांधव आपली गुरं घेऊन मेळघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या अंजनगाव, मोर्शी, परतवाडा इथपर्यंत येताना मेळघाटच्या जंगलाला पायदळी तुडवून उद्याचा मेळघाट होऊ पाहणाऱ्या नैसर्गिक रोपांना फस्त करीत हे गायी-म्हशींचे कळप हळुवार मार्गक्रमण करतात. उन्हाळा कडक झाला की जंगलाच्या सावलीने परतीचा प्रवास सुरु होता. मान्सूनपूर्वी हे गोपाल आपली गुरे घेऊन मेळघाटातील गावामध्ये परततात.

एकीकडे व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव संरक्षण कायदे कडक झाले तर दुसरीकडे गावानजिकचा चारा संपला. या परिस्थितीने मेळघाटचा गवळी बांधव संकटात आला. या गवळी बांधवाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी रवी पाटील नावाचा गोपालक माणूस मेळघाटात येऊन गेल्याचे समजले. मी थेट या माणसाकडे जाण्याचे ठरविले.

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार या तालुक्याच्या ठिकाणाहून उत्तरेकडे फक्त तीन कि.मी. अंतरावर बेसखेडा हे गाव आहे. तेथेच आठ एकर शेतावर रवी पाटील यांचा गुरांचा गोठा आहे. तिशीतला हा सडपातळ युवक पायाला भिंगरी बांधल्यागत भल्या मोठ्या गोठ्याचे नियोजन भराभर फिरुन दाखवित होता. गोठ्यात मध्यभागी सिमेंटची बांधलेली गव्हाण, गव्हाणीच्या दोन्ही बाजूंनी सुमारे ३०५० गायी बांधलेल्या. यात गावरान गायीपासून जर्सी, होस्टेनपर्यंत सर्वांचाच समावेश. गोठ्यालगत उत्तरेकडे खुल्या जागेत चांगल्या प्रतिचा देखणा वळू बांधलेला. त्याच्याच बाजूला तरूण कालवडी, नवीन जन्मलेली वासरे उनाडक्या करण्यात गुंग झालेली. गोठ्याच्या दक्षिणेकडे काही नवीन आलेल्या आजारी गायी तंदुरुस्त होऊन गोधनात समावेश होण्यासाठी आतूर झालेल्या. एवढंच नाही तर या गोधनाच्या अंगाखांद्यावर चुकून जर गोचिडासारखे परजीव प्राणी आलेच तर त्यांना अलगद टिपण्यासाठी कोंबड्याही तयार! काही कोंबड्या अंडे देण्यासाठी बसलेल्या तर काही दिलेल्या अंड्यांना उबविण्यासाठी बसलेल्या. गोठ्यानजिकच्या एका खोलीत रवी पाटील यांनी एक छोटेखानी दवाखानाही थाटलेला.

रवी पाटील मला गोठ्याबाहेर शेतात घेऊन गेले. आठ एकर शेतापैकी तीन एकर शेतात त्यांनी बाजरी, बरसिम, कांडीघास, ज्वारु व मका असा चारा लावला होता. शेत क्षारपाण पट्टयातील असल्याने मायक्रो स्प्रींकलरची व्यवस्था केली होती. आता महिन्याभरात बाजरीचा चारा येईल, दोन महिन्यात मका तर तीन महिन्यात ज्वारी! बरसिमत गवत दरवर्षी लावावे लागते. कांडीघास एकदा लावले की आयुष्यभर उत्पादन देत राहते. हिरव्या चाऱ्याचे हे नियोजन पाहून मी थक्क झालो.

शिक्षणाने इलेक्ट्रीकल इंजिनिअर असणाऱ्या पाटील यांची सुरुवात थक्क करुन टाकणारी आहे. कत्तलखान्याकडे अवैधरित्या जाणाऱ्या हाडकुळ्या गायी त्यांनी पोलिसात तक्रार देऊन पकडून दिल्या. पण पुढे सुपुर्दनाम्यावर देखरेख करण्याची विनंती आल्यानंतर ही गुरे पाळणे किती कष्टप्रद काम आहे हे त्यांच्या लक्षात आले. यातून ते स्टॉल फिडींग म्हणजे गोठ्यातच चारा उपलब्ध करुन देऊन गुरे कशी धष्टपुष्ट बनवायची हे शिकले. मुळात गुरांना सकाळ संध्याकाळ दोनच वेळा चारा पाहिजे असतो. त्यातही ३३ टक्के चारा ही गुरे वाया घालवितात. त्यामुळे कटर मधून बारीक करुन चारा दिल्यास कमी चाऱ्यात जास्त गुरे आपण पाळू शकतो हे ते शिकले. त्यामुळे गुरांना पचन चांगले होऊन, गोठ्यातच चारा दिल्याने गुरे रवंथ जास्त करतात. दूध जास्त बनवितात.

आपल्या अनुभवाबाबत माहिती देताना ते सांगतात, वळू चांगल्या प्रतिचा वापरल्यास भाकड गुरे कमी होऊन पुढची पिढी सुधारते. कोणत्या गायीपासून कोणत्या जातीचे पिलू घ्यायचे आणि ते कधी घ्यायचे हे पूर्णत: आपल्या हाती असते. गायी चरायला जंगलात सोडल्यास हे शक्य होत नाही. शिवाय त्यांच्या पायातील बोन कॅल्शियम कमी होते. गायी म्हशींना आराम मिळत नाही. त्यामुळे रवंथ कमी केल्याने दूधनिर्मिती मंदावते. आज २५ लिटरवरुन मी उत्पादन २५० लिटरवर नेले आहे. ही किमया गोठ्यातच चारा दिल्याने साधली आहे. शिवाय शेणखत व गोमुत्राच्या उत्पादनातही वाढ होते.

रवी पाटील मेळघाटचे उदाहरण देऊन म्हणाले, मेळघाटच्या ५० म्हशी व १२ गायी पाहणारा आमचा गवळी बांधव फक्त चार ट्रक शेणखत जमवितो. एवढ्यात गुरांपासून मला ३०० ट्रॉली (ट्रॅक्टरची) शेखणत मिळते. शिवाय मेळघाटच्या गुरांचे शेणखत वापरल्याने शेतात तण जास्त निघते. मेळघाटातील गायी जंगल चरुन गवताच्या अनेक प्रजाती व झाडोऱ्याच्या बीया शेणावाटे बाहेर टाकतात. शेणावाटे येणारे हे बी अधिक रुजलेले असल्याने या शेणखतापसून पिकामध्ये तण अधिक येते. निंदण्याच्या खर्चामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडते. त्यामुळे मेळघाटच्या गुरांच्या शेणखताला २००० तर माझ्याकडच्या शेणखताला २३०० रु. प्रती ट्रॉली मिळतात. मी वर्षाला ५ ते ६ लाख रुपयाचे शेणखत व गोमूत्र विकतो.

आजचा युवक या व्यवसायात उतरला व गोपालकांच्या मुलांनी जंगलात गुरे चारण्यापेक्षा गोठ्यात चारा तत्व अवलंबिल्यास दुग्ध उत्पादनात वाढ होऊ शकेल. याद्वारे जंगलाचा ऱ्हासही होणार नाही. रवी पाटलांचा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील काही गवळी बांधवांना ते या नियोजनबद्ध व्यवसायाची तालीम देत आहेत. नुकतेच ते मध्यप्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पातही अशीच तालीम देण्यासाठी जाऊन आले. महाराष्ट्र शासनाने रवी पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

अनिल गडेकर

No comments:

Post a Comment