Thursday, March 8, 2012

ॲपल बेर प्रकल्प

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा अवर्षणग्रस्त म्हणून परिचित असला तरीही या भागात डाळींब, बोर या फळांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. डाळिंबावरील तेल्या रोग तसेच बोरास योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता पर्यायी फळांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. सांगोला तालुक्यात अनेक प्रयोगशील शेतकरी असून अकोला (वासुद) येथील शेतकरी पांडुरंग आसबे यांनी पश्चिम बंगालमधील वैशिष्ट्यपूर्ण व सफरचंदासारख्या दिसणाऱ्या ‘ॲपल बेर’ नावाच्या बोरांच्या वाणांचा आगळा-वेगळा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.




श्री.आसबे हे सलग दोन वर्षे हा प्रयोग यशस्वीपणे राबवित आहेत. या ॲपल बोरांचे मार्केटिंग करण्यात यश मिळवून त्यांनी सध्या १०० किलो उत्पादन विविध बाजारपेठेत पाठविले आहे. त्याला सरासरी ३५ ते ४० रुपये प्रति किलो भाव मिळाल्याचे त्यांनी सांगितले.



आसबे हे ॲपल बेर या बोर जाती फळाविषयी माहिती देताना म्हणाले, हे बोर सफरचंदासारखे दिसते त्याचे वजन साधारण १०० ते १५० ग्रॅम भरते. चवीला गोड, वजनाला आणि दिसायला मोठे दिसते. आपल्या भागातील उमराण, चमेली, साधी बोर आदी वाणापेक्षा ही वेगळी दिसतात. हे ॲपल बेर देशी बोरापेक्षा फोड्या करून खावे लागते. जुन्या दोन एकर देशी बोरीच्या बागेची छाटणी करून दोन फूट खोड ठेवून ती पूर्ण कापून घेतली. त्यावर अँपल बेरचे डोळे भरून ती बाग धरली. साधारणत: जूनमध्ये १२ फूट बाय १२ फूट असे दोन झाडे व ओळीचे अंतर ठेवले. लागवडीवेळी प्रत्येक झाडास एक टोपले शेणखत टाकले. अर्धा किलो सुफर फॉस्फेट, अर्धा किलो लिंबोळी पेंड, दहा ग्रॅम फोरेट टाकले. सर्व झाडास ठिबकने पाणी पुरवठा केला. त्याचबरोबर १८.४६ एमओपी युरिया प्रत्येक एकरी तीन पोत्यांची मात्रा दिली. झाडांची वाढ चांगली झाली. किडी रोगांचा प्रतिबंध करण्यास मॅकोझेब, डायक्लोरव्हॉस यांचा वापर केला. वेळोवेळी कीटनाशकांच्या फवारण्या केल्या. दर आठवड्यांनी पाणी दिले.



या भागात हवामान कोरडे व उष्ण असल्याने ॲपल बेरला पोषक ठरत आहे. शिवाय गेल्या वर्षीच्या दहा रोपापासून लागवडीच्या अवघ्या चार ते पाच महिन्यात प्रति झाडास २० किलोनुसार २०० ते २५० किलो उत्पादन मिळाले. या बोरांची रोपे लागवडीपासून सहा महिन्यात फळाला येतात. सफरचंदासारखे हे दिसत असल्याने त्याला 'ॲपल' बेर नावाने सर्वत्र ओळखले जात आहे. याची जूनमध्ये लागवड झाल्यास डिसेंबर जानेवारीत त्यांचे उत्पादन सुरु होते. फळ हंगामात एका झाडास ५० किलो बोरे लागली आहेत.



खाण्यास वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण फळ असल्यामुळे ॲपल बेरला मागणी चांगली आहे. शिवाय आर्थिक फायदा होऊ लागल्याने शेतकऱ्यांतून याच्या लागवडीसाठी उत्साहही वाढत आहे. मजुरी, खते, कीडनाशके अन्य मशागतसह सर्व कामास एकरी सुमारे २५ हजार एवढा खर्च आहे. शेतकऱ्यांनी एक वेगळा प्रयोग म्हणून याकडे पाहण्यास हरकत नाही.





फारुक बागवान

No comments:

Post a Comment