Friday, March 30, 2012

पारंपरिक पिकाला पर्याय काकडीचा

जिद्द आणि नाविन्याची आवड असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश लाभते. त्यातही शेतक्षेत्रातील आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात चांगले पीक उत्पादन मिळते. पारंपरिक आणि अति खर्चिक ऊस पिकाला फाटा देऊन नव-नवीन पिकांची लागवड केल्यावर देखील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो, याचे उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

शेतीत विविध प्रयोग करण्यासाठी आवड असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील मुकुंद साठे या प्रयोगशील शेतकऱ्याने ऊस पिकाला पर्याय म्हणून अवघ्या २५ गुंठ्यात काकडीचे अडीच लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या लाख मोलाच्या काकडीने त्यांना चक्क लखपती केले आहे.

मुकुंद साठे हे विद्युत वितरण कंपनीत रोजंदारीत कामावर होते. मात्र शेतीची आवड असल्याने व शेती पाहण्यास दुसरे कुणी नसल्याने त्यांनी दोन वर्षांपूर्वी रोजंदारीचे काम सोडून शेती करण्यास सुरवात केली. शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना गेल्या वर्षी मल्चींग पेपरचा वापर करुन अर्धा एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. त्यातून त्यांना एक लाख ८० हजाराचे उत्पन्न मिळाले.

त्यानंतर त्यांनी आपल्या शेतामध्ये आणखी विविध प्रयोग करावयाचे ठरविले आणि ऑक्टोबरमध्ये काकडीची रोपे स्वत: तयार केली. १२ दिवसांनंतर नोव्हेंबरमध्ये २५ गुंठे क्षेत्रात मल्चींग पेपरचा वापर करुन काकडीची रोपे लावली. मल्चींगमुळे खुरपणीचा खर्च वाचला तसेच पाण्याचे बाष्पीभवनही कमी झाल्याने पाण्याची बचत झाली. योग्य नियोजन केल्याने अवघ्या २५ गुंठ्यात २७ टन काकडीपासून सुमारे अडीच लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी तीन टन म्हणजे एकूण २५ गुंठ्यात ३० टन काकडी निघणे अपेक्षित असल्याचे साठे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी अर्धा एकर टोमॅटोतून १ लाख ८० हजार रुपये उत्पन्न निघाले म्हणजे उसापेक्षा इतर पिके जास्तीत जास्त फायद्याची ठरू शकतात, हे टोमॅटो प्रयोगातून पटल्यामुळेच त्यानंतर काकडीचा प्रयोग केला. काकडीचे उत्पन्न अडीच लाख रुपये निघाले. त्यासाठी खर्च ५० हजार रुपये झाला. खर्च वजा जाता काकडीतून २५ गुंठ्यात दोन लाखांचा निव्वळ नफा मिळाल्यानचेही त्यांनी सांगितले. साठे यांची काकडी पुणे येथे मार्केटला पाठवली जात असून त्याला चांगला भावही मिळाला आहे.

साठे यांनी या प्रयोगाबाबत सांगितले की, शेतकऱ्याने पारंपरिक पिकांपेक्षा शेतात कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर नवनवीन प्रयोग केल्यास निश्चितच फायदा होतो. त्यांचा काकडीचा प्लॉट पाहण्यासाठी बार्शी, मोहोळ, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली असून त्यांच्या प्रयोगशीलतेचे अनेकांनी कौतुक केले आहे. तसेच पुणे येथील एका अग्रोटेक कंपनीने त्यांच्या शेतावर शेतकरी मेळावा घेऊन शेतकऱ्यांना साठे यांचा काकडी लागवडीचा यशस्वी प्रयोग दाखविला आहे.


  • रुपाली गोरे

  • No comments:

    Post a Comment