Saturday, March 31, 2012

नंदुरबार जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सौर उर्जेवर

वाढते भार नियमन व विजेचे वाढते दर लक्षात घेता नंदुरबार जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मधील विजेची उपकरणे सौर ऊर्जेवर चालविण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने सौर ऊर्जेची उपकरणे बसविण्यात आली आहेत. साधारणत: एक कोटी ८४ लाखांचा खर्च यासाठी येणार आहे. शासकीय कार्यालय सौर ऊर्जेवर चालविण्याचा जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग ठरणार आहे.

वीजेची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करीत आहे. त्याचा परिणाम सर्व घटकांवर होत आहे. प्रशासकीय यंत्रणादेखील त्यातून सुटलेली नाही. जिल्हा प्रशासनाची मध्यवर्ती इमारत असलेल्या भागात देखील भारनियमनामुळे दिवसभरातून सात तास वीजपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावरही त्याचा परिणाम होतो.

प्रशासनाने उच्च क्षमतेच्या डिझेल जनरेटरची व्यवस्था केली असली तरी त्यालाही मर्यादा येतात. शिवाय डिझेलचा खर्चही वाढतोच. त्यामुळे पर्यावरणप्रेमी असलेले नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.ए.टी.कुंभार यांनी जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर सौर पॅनेल बसवून त्याद्वारे वीजपुरवठा उपलब्ध करुन घेता येईल काय याची चाचपणी केली. त्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करुन अवघ्या दोन कोटी रूपयांच्या आत ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.

वर्षभरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे वीज बील व जनरेटरसाठी लागणारे डिझेल याचा विचार करता ही रक्कम अल्प होती. त्यामुळे डॉ.कुंभार यांनी सौर पॅनल बसवून त्याद्वारे वीजपुरवठा घेण्याचे ठरविले. जिल्हा नियोजन समितीत नाविन्यपूर्ण योजनेसाठीच्या खर्चातून एक कोटी ८३ लाख ७९ हजार रुपये मंजूर करुन घेण्यात आले. ही योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नुकतेच सौर पॅनेल बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तळमजल्यासह दोन मजले आहेत. यात एकूण २३० खोल्या असून त्यात जवळपास ४० पेक्षा अधिक कार्यालये आहेत. यातील २० पेक्षा अधिक महत्वाच्या कार्यालयांना सौर ऊर्जेवरील वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अर्थात या कार्यालयामध्ये दोन किंवा तीन ट्युब लाईटस्, तेवढेच पंखे व आवश्यक असलेले संगणक संच चालणार आहेत. सौर पॅनेलच्या माध्यमातून साठविलेली वीज ही दिवसभर वापरणे शक्य होणार आहे. पावसाळ्यात अर्थात ढगाळ वातावरणातदेखील ही यंत्रणा काम करणार आहे.

सौर ऊर्जेचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. सहज मिळणारी ऊर्जा म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात या ऊर्जेचा उपयोग करण्याकडे कल वाढत आहे. जिल्हाधिकारी डॉ.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, एन.आय.सी.चे प्रमुख संजय कोतकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भिमराज दराडे, उपजिल्हाधिकारी पी.ए.गायकवाड, प्रकाश थवील, कर्डक, सुरेश चौधरी याकामी प्रयत्नशील आहेत.

वीज समस्येवर प्रभावी उपाय म्हणूनही सौर ऊर्जेकडे पाहिले जात आहे. शासनातर्फे सौर ऊर्जेचा वापर करण्यासंबधी जनजागृती करण्यात येते. आता नंदुरबार जिल्हा प्रशासनाने स्वत:पासून सुरुवात केल्याने जनजागृतीत निश्चितच भर पडेल हे मात्र निश्चित.


  • मेघश्याम महाले

  • No comments:

    Post a Comment