Saturday, March 3, 2012

हिरव्या आईची माया..

'वानरांचा त्रास होतो पर आम्ही मिळून चांगलं पीक काढलं' गुहागर तालुक्यातील वाघजाई महिला बचतगटाच्या कमल ठोंबरे समाधानाने सांगत होत्या. सभोवताली शेतात सर्वत्र महिला काम करताना दिसत होत्या. पुरुष गडी विरहित शेत पाहून थोडे आश्चर्य वाटले. मात्र केवळ याच वर्षी नव्हे तर २००७ पासून या महिलांनी शेत पिकविण्याची करामत केल्याची माहिती मिळाली.

भुईमुगाच्या शेतीपासून सुरुवात करणाऱ्या खालच्या ठोंबरेवाडीतील या बचतगटाने इतर तीन गटांना सोबत घेतले. सरस्वती, सह्याद्री आणि समृद्धी गटाच्या सहकार्याने महिलांनी शेती करण्यास सुरुवात केली. वासंती गिजे आणि सुमिता माने या दोघींनी महिलांना एकत्रित करण्यात महत्वाची भूमिका अदा केली. ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळाल्याने महिलांचा उत्साह वाढला. १०० कुटुंबाच्या या वाडीत ६० महिला बचतगटाच्या माध्यमातून शेती करू लागल्या.

पहिल्या वर्षी ७० ते ८० हजारांचा फायदा झाल्याने गटाने बँकेकडून साडेचार लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यापैकी आतापर्यंत केवळ दीड लाखांची उचल केली असून ७० हजारांची परतफेडही केली आहे. गटाने एक एकर क्षेत्रात चवळी आणि तूर तर एक एकर क्षेत्रात कलिंगड लावला आहे. शेतात भातशेती नंतर विविध प्रकारच्या भाज्या पिकवून त्यांची विक्री या महिला स्वत: गावोगाव जाऊन करतात. त्यामुळे चांगला लाभ मिळत असल्याचे या महिलांनी सांगितले.

शेतीचे प्लॉट दोन वेगवेगळ्या ठिकाणी असूनही कामाचे उत्तम नियोजन या महिला करतात. शिमगोत्सवाच्या वेळी कलिंगडापासून अधिक उत्पन्न मिळेल, असा विश्वासही या महिलांनी व्यक्त केला. महिलांनी शेतीच्या यशात सातत्य ठेवल्याने त्यांना २०१०-११ या वर्षासाठी तालुका स्तरावरील राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या शेतीसारख्या क्षेत्रात महिलांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असेच आहे. या यशाविषयी प्रतिक्रिया देताना एका सदस्याने 'हिरव्या आईची माया..' एवढे मोजके शब्द उच्चारले. लालसर मातीवर हिरवे स्वप्न फुलविण्यासाठी या महिलांनी घेतलेल्या कष्टाला मिळालेले हे फळ आहे. परिसरातील महिलांना कार्याची प्रेरणा देणारा हा बचतगट यशाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे जात आहे.

  • डॉ.किरण मोघे
  • No comments:

    Post a Comment