Wednesday, March 14, 2012

यशाची 'त्रिवेणी'


कोकणातल्या हिरव्यागार दऱ्याखोऱ्यातून आणि इथल्या डोंगररांगांमधून पसरलेल्या दाट झाडींवर काजू, आंबा, कोकम, आवळा, करवंद, जांभूळ अशी अनेक प्रकारची फळे मुबलक प्रमाणात येतात. मात्र स्थानिक स्वरुपाच्या विक्रीवरच ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागते. त्यापासून मिळणारा लाभही मर्यादित स्वरुपाचा असतो. लाभाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योग हाच एकमेव मार्ग आहे. गुहागर तालुक्यातील त्रिवेणी बचतगटाने पारंपरिक व्यवसायाचा मार्ग न स्वीकारता नेमके याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले आणि आज हा बचतगट प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल करतो आहे.

शीर गावातील स्वच्छता समितीचे सचिव वासुभाऊ गुरव यांनी प्रक्रिया उद्योगापासून घरगुती स्वरुपातील उत्पादने बनविण्याचे कणकवली येथे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाचा गावाला फायदा व्हावा म्हणून त्यांनी बचतगटाच्या महिलांना एकत्रित करून त्यांना त्याच स्वरुपाचे प्रशिक्षण दिले. गावातील त्रिवेणी बचतगटाच्या सदस्यांनी या व्यवसायात विशेष रस दाखविला. २००४ मध्ये स्थापन झालेल्या या गटाने आपल्या व्यवसायाची सुरुवात काजू प्रक्रियेच्या माध्यमातून केली. पहिल्याच वर्षात विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून ५० हजार रुपयांचा व्यवसाय केल्याने महिलांचा उत्साह वाढला. त्यांनी विविध प्रकारची सरबते तयार करण्यास सुरुवात केली.

सरबत तयार केल्यानंतर त्याचे व्यवस्थित ब्रँडींग आणि पॅकेजिंग यावरदेखील लक्ष देण्यात आले. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बाटल्या, स्टीकर्स आदींचा उपयोग करण्यात आला. शेतीची कामे आटोपल्यावर विविध जिल्ह्यात होणाऱ्या बचतगट प्रदर्शनात स्टॉल्स लावून उत्पादनांची विक्री करण्यावर गटाने भर दिला. मुंबईच्या बिग बझारची १ लाख ८१ हजाराचा माल देण्याची मागणी या गटाने इतर गटांच्या साहाय्याने पूर्ण केली. या मोठ्या यशामुळे महिलांनी उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. यावर्षीदेखील गटाने कोकण सरस प्रदर्शनात २५ हजार, वांद्रे येथील सरस प्रदर्शनात २२ हजार आणि गणपतीपुळे येथे १६ हजार रुपयांची विक्री केली आहे.

पापड, लाडू पासून सुरु झालेला व्यवसाय आता प्रक्रिया उद्योगावर स्थिरावला आहे. अननस, आवळा, कोकम, काजूबोंड, लिंबू, आंबा आदी प्रकारचे सरबत तसेच आवळामावा, आवळा अर्क, आवळा चूर्ण, विविध प्रकारची लोणची आदी उत्पादनांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. घरकाम सांभाळून गटाच्या महिला हा व्यवसाय करतात. बँकेचे व्यवहारदेखील महिला योग्य प्रकारे सांभाळत आहेत. कोकणातील या उत्पादनांना मोठ्या शहरातून चांगली मागणी आहे. इथले वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन बाजारात नेताना आधुनिक व्यवसाय पद्धतीचा उपयोग करून या गटाने विविध प्रदर्शनातून चांगला लाभ मिळविला आहे. कल्पकता, परिश्रम आणि प्रशिक्षण या 'त्रिवेणी'च्या आधारे गटाने मिळविलेले यश कौतुकास्पदच आहे.

No comments:

Post a Comment