Thursday, March 29, 2012

बचतगटातील महिलांनी केली पाणीपट्टी वसुली

परभणी जिल्‍ह्यातील खांबेगावच्‍या महिला बचतगटानं पाणीपट्टी वसुलीचा उपक्रम यशस्‍वीपणे राबवला. या उपक्रमाचं राज्‍यस्‍तरावर कौतुक झालं. महाराष्‍ट्र शासनानं पाणीपट्टी वसुली महिला बचतगटाकडं देण्‍याचा निर्णय घेऊन त्‍यावर शिक्‍कामोर्तब केलं. त्‍यानुसार परभणी जिल्‍ह्यातील मुळी या गावातील महिला बचतगटानं पाणीपट्टी वसुलीचा आदर्श निर्माण केलाय.

मुळी हे गाव गंगाखेडपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या बचतगट चळवळीमुळं या गावात परिवर्तनाचं वारं वाहत आहे. या विषयी परिवर्तन गाव समितीच्‍या अध्‍यक्षा वंदना भोसले यांनी माहिती दिली. त्‍या म्‍हणाल्‍या, साधारण २००५-२००६ ची गोष्‍ट. आमच्‍या गावात माविमंच्‍या सहयोगीनी आल्‍या. त्‍यांनी बचतगटाविषयी माहिती दिली. महिलांनी एकत्र यायचं, दरमहा पैसे गोळा करायचे, एकमेकींना कर्ज म्‍हणून द्यायचे. असं बरंच काही सांगितलं. आम्‍हाला बचतगटाविषयी काही रस वाटत नव्‍हता. पण नियमित एकत्र येण्‍यामुळं, चर्चेमुळं बचतगटाच्‍या चळवळीविषयी आपुलकी निर्माण होत गेली. आम्‍ही २७ जानेवारी २००६ ला सरस्‍वती महिला बचतगट स्‍थापन केला. १२ जणी सभासद होत्‍या. नियमित बचत करु लागलो. तशी मला नेतृत्‍व करण्‍याची आवड होतीच. बचतगटाच्‍या रुपानं मला ती संधी मिळाली.

एकमेकींच्‍या सहकार्यानं गावात १८ गट तयार केले. महिलांनी परिवर्तन गावस्‍तरीय समितीची अध्‍यक्षा म्‍हणून माझ्यावर जबाबदारी टाकली. या समितीच्‍या माध्‍यमातून आम्‍ही संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियान राबविलं. समितीतील सदस्‍य व इतर अनुभवी महिलांच्‍या सहकार्यानं हे अभियान यशस्‍वी झालं. गावाला आमच्‍या कामाची ओळख झाली.

सन २००८ च्‍या दरम्‍यान जलस्‍वराज्‍य प्रकल्‍प पूर्ण झाल्‍यानंतर त्‍याची देखभाल चांगली होण्‍याच्‍या दृष्‍टीनं जबाबदारी कुणाला द्यायची याविषयी सरपंचांनी गटातील महिलांसोबत चर्चा केली. खांबेगाव पॅटर्ननुसार महाराष्‍ट्र शासनानं पाणीपट्टी वसुली महिला बचतगटाकडं देण्‍याचा निर्णय घेतला होताच. त्‍यानुसार पाणी पुरवठा व प्रकल्‍प देखभाल दुरुस्‍तीचं काम आमच्‍या परिवर्तन गाव समितीनं स्‍वीकारावं, असा निर्णय सर्व महिलांच्‍या साक्षीनं झाला.

मे २००८ मध्‍ये प्रकल्‍पाच्‍या देखभाल दुरुस्‍तीचं काम तर मिळालं. पण अनेक अडचणी उभ्‍या राहिल्‍या. गावकरी नळपट्टी भरत नव्‍हते, परंतु नळाला पाणी आलं नाही तर भांडायला यायचे. अशा भांडणांमुळं जीव वैतागून जायचा. कुठून हे काम स्‍वीकारलं, असं वाटायचं. पण आम्‍ही धीर सोडला नाही. बचतगटामुळे परिस्‍थितीवर मात करायचा आत्‍मविश्‍वास निर्माण झाला होता. गावातील ३ वॉर्डांमध्‍ये ३ गावसमिती सदस्‍यांवर पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी टाकली. ही जबाबदारी पार पाडतानाच पाणी पुरवठा करताना येणाऱ्या अडचणी जाणून त्‍या दूर करण्‍यास सांगितल्या. एक नंबर वॉर्डात मी, दोन नंबर वॉर्डात मैदाबी सय्यद अन् तीन नंबर वॉर्डात गोदावरी हनवते अशा आम्‍ही तिघींनी कामास प्रारंभ केला. नळावर महिला पाणी भरतात, परंतु पाणीपट्टी पुरुषांकडं मागावी लागते, हा विरोधाभास लक्षात आला. यावर उपाय म्‍हणून नळ कनेक्‍शन महिलांच्‍या नावावर करण्‍याचा धोरणात्‍मक निर्णय घेतला. ग्रामपंचायतीने सहकार्य केले. महिलांच्‍या नावावर नळ असल्‍याने नळपट्टी महिलांकडेच मागण्‍यात येऊ लागली. आपण घरासाठीच पाणी भरतो, मग दर दिवसाला दीड रुपयाप्रमाणे महिन्‍याला ४५ रुपये देणे अवघड नाही, अशा शब्‍दात त्‍यांना साद घातली. घरोघरी जाऊन पाणीपट्टी वसुलीचे महत्व पटवून देण्‍यात आले. पैसे देणाऱ्या महिलेला लगेच पावती दिली जायची. पैसे नसतील तर पुढच्‍या महिन्‍यात भरण्‍याची सवलत दिली जायची. महिलांची मानसिकता बदलवण्‍याच्‍या कामात पद्मिनीबाई भोसले यांचीही खूप मदत झाली.

आमच्‍या समितीमार्फत गावात नियमित पाणीपुरवठा सुरु आहे. सर्व वॉर्डात एकाच वेळी पाणी सोडणं शक्‍य नसल्‍यानं एका वॉर्डात सायंकाळी पाणी सोडलं जातं. महिला नळपट्टी नियमित भरत असून १ लक्ष ६१ हजार ९१० रुपये वसुली झालेली आहे. आज गावात ३७५ नळ कनेक्‍शन्स आहेत. या कामातून पाणी पुरवठा करणारी व्‍यक्‍ती तसंच विद्युत पंपाचं वीज बील व दुरुस्‍ती यासाठी मिळकतीचा ८० टक्के भाग गावसमितीकडं वेगळा ठेवलेला आहे. पाणीपट्टी वसुलीच्‍या २ टक्‍के रक्‍कम आम्‍हा तिघींना मिळत आहे. त्‍याचबरोबर गावसमितीस व ग्रामपंचायतीस प्रत्‍येकी १० टक्‍के रक्‍कम देण्‍याचे ठरवलं आहे. पाण्‍यासाठी महिलेलाच कष्‍ट करावे लागतात. आज आम्‍ही प्रत्‍येक घरात सुरळीत पाणीपुरवठा सुरु करुन आमच्‍या बहिणींचे कष्‍ट कमी करण्‍याचा प्रयत्‍न केलाय, याचा आम्‍हाला सार्थ अभिमान आहे.


  • राजेंद्र सरग

  • No comments:

    Post a Comment