Monday, March 19, 2012

बालकांच्या कुपोषण मुक्तीत कुटुंबाचा सहभाग

कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी गेली ३५ वर्ष आपण प्रयत्न करीत आहोत. पण अद्यापही कुपोषणाच्या विळख्यातून राज्याची पूर्णपणे सुटका झालेली नाही. शासनस्तरावर अनेक उपाययोजना, राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान आदि विविध स्तरावर कुपोषण निर्मुलनासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु प्रत्येक कुटुंबाची कुपोषण संदर्भातील महत्वाची भूमिका असते. यासाठी कुपोषण म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. शासकीय स्तरावर जाणीव जागृतीचे काम होत आहे त्यात भाग घेणे हे ही तितकेच गरजेचे आहे.

वय, वजन आणि उंची यावरुन बालक कुपोषित आहे किंवा नाही हे ओळखता येते. जन्माच्या वेळी बाळाचे वजन ३ किलो असेल तर ते बाल कुपोषित नाही असे निशंकपणे म्हणता येईल. पहिल्या वर्षी बाळाचे वजन दर २ महिन्यांनी एक किलोने वाढते. दुसऱ्यावर्षी बाळाचे वजन दर ४ महिन्यांनी एक किलो वाढते. तिसऱ्या वर्षापासून सहाव्यावर्षापर्यंत बाळाचे वजन दर ६ महिन्यांनी एक किलोने वाढते. म्हणजे साधारणपणे असे म्हणता येईल की बाळ सहा महिन्याचे झाले की त्याचे वजन ६ किलो, १२ महिने झाले की ९ किलो, दीडवर्ष १०.५ किलो, दोन वर्ष १२ किलो, अडीच वर्ष १३ किलो, तीन वर्ष १४ किलो, साडेतीन वर्ष १५ किलो, चार वर्ष १६ किलो, साडेचार वर्ष १७ किलो आणि ५ वर्ष १८ किलो वजन असेल तर ते आदर्श वजन वा बाळाची वाढ योग्य होते आहे हे लक्षात येते.

तथापि जन्माच्या वेळी बाळाचे वजन २.५ किलो पर्यंत असले तरी आपण खुश होतो. वास्तविक ते काही बाळाचे आदर्श वजन नव्हे. आपल्या लक्षात आले पाहिजे. मग कुपोषणाची नेमकी कारणे काय आहेत ? तर आहार व बाल संगोपनाच्या चुकीच्या पध्दतीमुळे बालके कुपोषणास बळी पडतात. रक्तात लोहाची कमतरता, जंत, आयोडीनची कमतरता, झिंकची कमतरता, अतिसार होणे शिवाय जन्मत: कमी वजनाची बालके, जीवनसत्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण, न्युमोनिमा ही कुपोषणाची कारणे आहेत.अर्भक कमी वजनाचे असण्याची दुसरी कारणे म्हणजे मुलीचे कमी वयात लग्न, दोन अपत्यात अंतर कमी, एका कुटुंबात अनेक मुले, आईचे वजन कमी, वेळेपूर्वी प्रसूती, कमी वयात बाळंतपण, बाळंतपणाची वारंवारता.

बालकातील कुपोषण ही अतिशय गंभीर बाब असून ० ते २ वर्ष वयोगटातील बालकांची वाढ व विकास खुंटला तर कायमचा बुध्दी व शरीर वाढीवर परिणाम होतो. यासाठी वेळीच उपाय योजना केल्या पाहिजेत. बाळाच्या विष्टेची योग्य विल्हेवाट लावणे. २४ महिन्यापर्यंत उकळलेले पाणी थंड करुन पाजणे, एक वर्ष झाल्यावर सहा महिन्यांनी जंतनाशक औषध देणे, हात साबणाने स्वच्छ धुवूनच बाळाला औषध, आहार देणे, अतिसार झाल्यास झिंकची औषधे देणे, त्याचबरोबर सर्व लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे करणे, आयोडीनयुक्त मीठाचे सेवन, बाळ ९ महिन्याचे झाल्यावर आहारात अ -जीवनसत्व मुबलक असले पाहिजे. दर महिन्याने त्याचा डोस देणे, आहारात पुरेसे लोह असणे, लोह गोळया किंवा स्प्रिंकल देणे, आहाराची वारंवारता म्हणजे दिवसातून बाळास ३-८ वेळा खायला देणे, आहारात उष्मांक, प्रथिने आणि सूक्ष्म द्रव्य असणे, बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर आईच्या दुधासह पूरक आहार देणे, सहा महिने पर्यंत निव्वळ स्तनपान आणि बाळ जन्म झाल्यानंतर एका तासाच्या आत चिकाचे दूध पाजणे. अशा तऱ्हेने बाळाची काळजी घेतली तर बाळ केव्हाच कुपोषणाला बळी पडणार नाही.

अ-जीवनसत्वासाठी लाल पिवळया भाज्या व फळे, हिरव्या पालेभाज्या, अंडी, ९ महिन्यानंतर दर सहा महिन्यांनी अ जीवनसत्वाची मात्रा देणे आवश्यक आहे. शरीरात पुरेशा प्रमाणात लोह (आर्यन) मिळावे यासाठी हिरव्या पालेभाज्या, आळीव, शेपू, अंडी, मांसाहरी पदार्थ आणि अन्न शिजविण्यासाठी लोखंडी भांडयाचा वापर करावा. शिवाय आहारात आयोडीनयुक्त मिठाचा वापर गरजेचा असून आयोडिनमुळे मेंदूच्या व शरीराच्या सर्वांगीण विकास होतो. बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी व त्याचे कुपोषण होऊ नये यासाठी वर उल्लेख केलेल्या बाबींचा वापर केल्यास बाळाची वाढ उत्तम होईल.


  • जी.डी. जगधने

  • No comments:

    Post a Comment