Saturday, March 31, 2012

सुरंगीचा गंध ... मन होई धुंद

ऑफिस कामामुळे प्रवास अपरिहार्य असतो. प्रवासात निसर्गाची किमया पहात बराच वेळ जातो. या सर्व प्रवासात अनेक नव्या गोष्टींची ओळख होते. कोकणात निसर्ग मानवी मनाला वेडावून टाकतो. असाच वेंगुर्ल्याला निघालो असतानाच वेंगुर्ल्याच्या अलीकडे एक सुगंध जाणवायला लागला. या वासाची चाहूल घेतली असता दिसले सुरंगी फुलाचे वळेसार. सहज थांबलो. चौकशी केली.

माहिती मिळाली की या भागात आरवलीच्या वेतोबाची सुरंगीच्या वळेसारांनी पूजा बांधण्याची प्रथा आहे. दरवर्षी श्री देव वेतोêबाची मूर्ती सुरंगीच्या वळेसारांनी सजवली जाते. शिरोêडा येथे होळीला सुरंगीचे वळेसार बांधण्याची प्रथा आहे. कितीही महाग असला तरी शिरोड्यातील ग्रामस्थ सुरंगीचा वळेसार खरेदी करुन होळीला बधंण्याची परंपरेचे आजही पालन करीत आहेत.

अणसूर, खानोली,दाभोली,आसोली भागातील महिला सायंकाळच्या वेळी सुरंग कळया काढून त्या दोऱ्यात गुंफून त्याचे वळेसार बनवितात. सध्या वेंगुर्ले,शिरोडा येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सुरंगीचे वळेसार विक्रीसाठी येत आहेत.

वेंगुर्ले तालुक्यात दाभोली,खानोली,आरवली, टांक, अणसूर, आसोली, न्हैचीआड भागात सुरंगी कळीचे उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षापासून सातत्याने सुरंगी कळयांना मागणी वाढत असल्याने चांगला दरही मिळत आहे.या वर्षी विक्रमी दर मिळाल्याने शेतकरी खूष आहेत. मात्र कळी काढणीचे काम अत्यंत जोखमीचे असते.

पूर्वी मातीमोल दराने विक्री होणा-या या फुलांना आता चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या रानातील सुरंगीचे कळे फुल वाया जाऊ न देता कळया काढूüन विकण्यावर लक्ष देत आहेत. हे विशेष.

सुरंगीच्या झाडाखाली साड्या,चादरी,गोणपाट, सतरंजी वगैरेचे आच्छादन घालून झाडावर चढून कळया पाडण्यात येतात. नंतर या कळया एकत्र करुन वाळविल्या जातात व विक्रीसाठी पाठवल्या जातात. भारताप्रमाणे परदेशांतही सुरंगी कळीला मोठी मागणी आहे. सुवासिक तेल,साबण बनविण्यासाठी सुरंगी कळीचे तेल वापरले जाते.
या वर्षाच्या हंगामात सुरुंगीच्या कळीला चांगला दर मिळाला आहे. सध्या वेंगुर्ला तालुक्यात २६० रुपये किलो दराने सुरंगीची कळी खरेदी केली जाते. गेल्या काही वर्षात सुरंगीच्या कळीला मागणी वाढते आहे. आता सुरंगीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुरंगी लागवडीला प्रोत्साहन मिळाल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल,असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. दोन वळेसार घेतले. अशा या वेडावून टाकणाऱ्या सुरंगीच्या गंधाने मन प्रसन्न झाले होते.गाडी वेंगुर्ल्याच्या दिशेने धावू लागली होती अन वाटले अरे ही तर चैत्रातल्या नव्या पर्वाची नांदीच असावी.


  • डॉ.ग.व.मुळे

  • No comments:

    Post a Comment