Wednesday, July 25, 2012

कावीळ रोग... चला दक्षता घेऊ या !

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काविळीच्या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागले असून इचलकरंजी शहरात काविळीमुळे काही रुग्ण दगावले आहेत. सांगली व मिरज शहरातही कावीळचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होवू लागले आहेत. कावीळ रोगाबाबत जनतेने घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र योग्य ती दक्षता व काळजी घेतल्यास आणि वेळेत उपचार केल्यास कावीळ निश्चित बरी होते असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.

सांगली जिल्ह्यात विशेषत: सांगली व मिरज शहरामध्ये कावीळ रोगाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेवून कार्यवाही सुरु केली आहे.

सांगली जिल्ह्यात आरोग्य विभागाने साथ रोग नियंत्रणासाठी १४ दक्षता पथके नियुक्त केली असून जिल्हा व तालुकास्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली.

काविळीची लक्षणे
• कावीळ झालेल्या रुग्णांचे डोळे पिवळे धमक होतात
• लघवी पिवळी होते
• माणसाचे वजन घटते
• उलटी व अतिसार होणे
• ताप येणे
• पोटात दुखणे
• यकृतावर सूज येणे
• अशक्तपणा
• थकवा जाणवणे आदी लक्षणे कावीळ रोगाबाबत रुग्णामध्ये आढळून येतात असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी सांगितले आहे.

खबरदारीचे उपाय
• प्रत्येकाने पाणी उकळून थंड करुनच पिणे
• कावीळची साथ असणाऱ्या भागात न जाणे
• जेवणापूर्वी व शौचास जावून आल्यानंतर हात धुणे
• उघड्यावर शौचास न बसणे
• बाहेरचे खाद्य पदार्थ न खाणे आदी बाबत खबरदारी घेण्याची गरज आहे असे डॉ. शरद घाडगे यांनी सांगितले आहे.

काविळीवर लस उपलब्ध आहेत. तीन आठवडयामध्ये या लसीने रुग्ण बरा होतो. रुग्णांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेवून तपासणी करुन घ्यावी. शक्यतो घरगुती औषधोपचार करु नयेत असे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सर्वापचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भागवत यांनी सांगितले आहे.

सर्वसामान्यपणे ए.बी.सी. आणि इ अशी चार प्रकारची कावीळ रुग्णामध्ये आढळून येते. कावीळ हा आजार साथीच्या स्वरुपात येण्याची शक्यता असते.

ए आणि बी ही कावीळ तुरळक प्रमाणात आढळून येते. सी ही कावीळ रक्त संक्रमणामुळे होते. बी प्रकारची कावीळ ही रक्तातील विषाणू आाणि लैंगिक संबंधामुळे होवू शकते. कधी कधी दूषित पाण्यामुळेही बी प्रकारची कावीळ होते.दूषित पाण्यातील विषाणूमुळे होणाऱ्या ए आणि ई या प्रकारातील काविळीचा प्रसार मात्र वेगाने होतो.

हा आजार झालेल्या रुग्णांची विष्ठा ड्रेनेज आणि सांडपाण्याच्या किंवा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याशी येणारा संपर्क यांच्यामुळे ही कावीळ झपाट्याने पसरते. सार्वजनिक आंघोळीच्या ठिकाणी काविळीचे विषाणू पसरतात.ए आणि ई ही कावीळ दूषित पाण्याबरोबरच घरातील पाण्यापासूनही होते. कधीकधी कुपनलिकेच्या पाण्यातून या विषाणूचा धोका जास्त असतो.

काविळीची लागण झालेल्या रुग्णंाच्या संख्येच्या प्रमाणात या आजाराने रुग्ण दगावण्याची संख्या अत्यल्प असते. पण या आजाराचे गांभीर्य मात्र कमी होत नाही. लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृध्दांमध्ये काविळीचा प्रादुर्भाव जास्त होतो.काविळीचे विषाणू मारण्याचे औषध अद्याप उपलब्ध झालेले नाहीत, मात्र उपचाराने रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवून रुग्ण बरा होतो.अधिकृत मान्यताप्राप्त आयुर्वेदिक डॉक्टरांकडून काविळीवर उपचार घेतले जातात.

पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनीच कावीळ रोगाबाबत दक्षता घेण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

कावीळ या आजाराच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी महापालिकेच्या, नगरपालिकेच्या, आरोग्य विभागाशी त्वरीत संपर्क साधावा.


  • दिलीप घाटगे,माहिती अधिकारी, सांगली
  • No comments:

    Post a Comment