Tuesday, April 9, 2013

आरोग्यम धनसंपदा!

शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ अशी आपल्याला आरोग्याची नवीन व्याख्या करावी लागेल. आरोग्य म्हणजे केवळ रोग मुक्त असणे असे नव्हे. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याबाबत जागरुक असणे प्रत्येकालाच आवश्यक आहे. आजची युवा पिढी ही जंक फुडच्या आहारी गेली आहे. उद्याची पिढी ही सृदृढ असणे आवश्यक आहे. त्यांच्यावर देशाचे भविष्य अवलंबून आहे.

7 एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस आहे. जगात उद्‌भवणा-या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या विषयी जागतिक पातळीवर जनजागरण करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडील आकडेवारी नुसार 2020 सालापर्यंत जगातील विविध रोगांच्या प्रादुर्भावापैकी 70 टक्के रोग हे असांसर्गिक स्वरुपाचे उच्च् रक्तदाब, ह्दयविकार, कर्करोग असे असतील. अशा रोगामुळे जगात दरवर्षी 20,000 लोकांचा मृत्यू होतो.

सध्या यांत्रिकी उपकरणामुळे शारिरीक कष्ट् कमी होत चालले आहेत. कपडे धुणे, भांडी घासणे, पिठ मळणे, दळणे, कुटणे ही कामे यंत्रच करीत आहेत. त्यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होत आहे. त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे. विज्ञानाने भौतिक सुख माणसाला दिले आहे. पण त्यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य हरवले आहे.युवा पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. युवक धुम्रपान, गुटखा, तंबाखू यांच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे शरीरातील अवयवांना अपाय होवून कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आजच्या व्यसना या रोगापासून आपली सुटका केली पाहिजे जेणेकरुन भावी आयुष्यात ते निरोगी जीवन जगू शकतील.

आज प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे कार्बन वायू शोषून घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिग सारखी समस्या निर्माण झाली आहे. सी एफ सी सारख्या क्लोरीनयुक्त वायुमूळे वातावरणातील ओझोनच्या थराला छिद्रे पडले असून, येणा-या अतिनील किरणामुळे होणा-या कॅन्सरसारख्या विकारांचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणातील आवाजाची प्रचंड वाढलेली पातळी यंत्रे, कारखाने यातूनच निर्माण होत असून त्यामुळे बहिरेपणाची समस्या वाढली आहे. जलप्रदूषणामुळे डेंग्यू, मलेरिया असे रोग माणसावर अतिक्रमण करीत आहे. दूषित पाण्यामुळे कॉलरा, पोटाचे आजार यांचे प्रमाण वाढत आहे.

सध्या व्यायाम, योगासने करण्याकडे लोक टाळाटाळ करतात. त्यासाठी मुहूर्त ठरवितात. मुहूर्त ठरवून सुरु केलेला उपक्रम हा आठवडाभर चालतो. नंतर जैसे थे परिस्थती येते. मग वेळ मिळत नाही हे कारण सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळते. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी व्यायाम करायला सांगितल्यावर मग त्याचे महत्व कळते आणि मग सुरुवात होते. परंतु त्याला उशीर झालेला असतो. जर आपण पहिल्यापासून व्यायाम, योगासने नित्यनियमाने केली तर डॉकटरांकडे जाण्याचा प्रश्नच उद्‌भवणार नाही.

आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणजेच स्वत:साठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आपण सर्वांनी संकल्प करु या तो नुसता संकल्प न ठेवता प्रत्यक्षात अंमलात आणू या. आरोग्य हे धन आहे आणि प्रत्येकाने शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

शैलजा देशमुख
विभागीय माहिती कार्यालय,
कोंकण विभाग, नवी मुंबई